दुसरा दृष्टीकोन:
आदिवासी जमातींना भेटी देऊन त्यांच्यात काम करण्याचे फॅड गेले काही दशकापासून होत आहे. काही अपवाद वगळल्यास आदिवासी पर्यटन होत आहे.कोणीतरी रिटायर झालेले काका उर्वरित काळ आता आदिवासींच्या उध्दाराची जबाबदारी आपल्यावर येऊन पडल्याच्या अविर्भावात आदिवासींच्या उद्धाराचे महत्कार्य करीत असतात, त्यांच्या अवती भवती असणाऱ्या गरगरीत बरण्यांचे मंडळ, काही सेवनिवृत्तांचे मंडळ यांना घेउन हे काका या पर्यटनाचे काम करीत असतात.
गेली अनेक दशके मेळघाटात सेवाकार्य करूनही त्या भागातील आदिवासींची अवस्था तशीच आहे, त्यात काही बदल घडला असता तर रोज नव्या दमाने तेथे जाणाऱ्या समाजसेवी संस्था कशाला दिसतील, पण जवळपास माणसामागे एक समाजसेवी संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात तेथे समाजसेवी संस्था काम करीत आहेत. रोज नव्या दमाने तिथल्या आदिवासींचे प्रश्न पुण्या-मुंबईच्या लोकांपुढे मांडल्या जातात. आदिवासींच्या सहानुभूतीचा धंदा अनेकांचा झाला आहे.
असो....
माझा दृष्टिकोन वेगळाच आहे.
आपण जातो आदिवासींचे प्रश्न सोडवायला, पण त्या आधी आपले स्वतः चे प्रश्न खरंच सुटले आहेत का? बिगर आदिवासी समाजापुढे आता काहीच प्रश्न उरले नाहीत का? हे स्वतःला एकदा विचारले पाहिजे.
आता मी काही तुलना करतो,
मुलगा होत नाही म्हणुन सासरच्या लोकांनी सुनेचा छळ करणे, मुलगी असलेला गर्भ पोटातच मारून टाकण्याचे प्रमाण, दाग-दागिने, गाडी बंगला यासाठी सुनेचा छळ, नवरा -बायकोचे पटत नाही म्हणून घटस्फोटांचे प्रमाण, किंवा घटस्फोट घेण्याचे धारिष्ट्य नसल्याने रोज होणारी नवरा बायकोची भांडणे आणि धुसफूस, आपले इतरांबरोबरचे संबंध, बहीण-भाऊ, दीर-भावजय, जावा-जावा, सासू-सून, नणंद-भावजय, शेजारी-पाजारी, आप्त-स्वकीय इत्यादी यांच्या बरोबर कसे आहेत, भौतिक सुखसोयीसाठी हपापले पणा आणि त्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब, अनैतिकता इत्यादी यासर्व गोष्टी आपल्या पुढारलेल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र याच गोष्टी तुम्हाला आदिवासी समाजामध्ये अपवादानेही दिसणार नाही.
मग प्रगत समाज कोणता समजायचा? आणि अप्रगत समाज कोणाला म्हणायचे? कोणी कोणाचे प्रश्न सोडवायला जायचे?
खरं तर आदिवासी पाडे वस्त्यांना भेट देऊन त्यांचे जीवन पाहून स्वतःचे प्रश्न सोडवता येतील, नवरा-बायको, सासू-सून, नणंद-भावजय इत्यादी एकमेकांशी चांगले संबंध कसे ठेवावेत? घटस्फोटांचे प्रमाण शून्यावर कसे असावे? कमीत कमी गरजा मध्येही आनंदी कसे जगावे. भौतिक महत्वाकांक्षा, मोह, लोभ यापासून दूर कसे राहावे, शुद्ध सात्त्विक कसे जगावे याचा वस्तुपाठ घेण्यासाठी खरे तर इथे भेटी दिल्या पाहिजेत, या भेटीतून आपले प्रश्न कसे सोडवता येतील हे पहिले पाहिजे, पण आपण इतके अहंकारी आणि दांभिक असतो की जणू आपल्याला काही प्रश्नच नाहीत, आपले कसे अगदी उत्तम चालले आहे असा आभास निर्माण करतो, आणि स्वतःची फसवणूक करून घेत असतो. या भ्रमातून लवकर बाहेर पडले पाहिजे.
राजेंद्र धारणकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा