स्थळ: येरवडा पोलीस स्टेशन जवळ वाहतूक शाखा
वेळ: दुपारी सव्वा दोन ते अडीच च्या सुमारास दिनांक 14/09/2022या ठिकाणी दुपारी एका कारमधून एक महिला आणि दोन पुरुष प्रवास करीत असताना येरवडा पोलीस स्टेशन पुढील चौकात सिग्नलवर थांबलेले होते. त्याच वेळेस समोरून नो एंट्रीतून एक टेम्पो समोरून येताना दिसल्याने त्या कारमध्ये पुढे बसलेल्या सद्गृहस्थाने वाहतुकीचा नियम तोडून येणाऱ्या टेम्पोचा फोटो काढला. हा टेम्पो नो पार्किंग मधल्या गाड्या उचलून वाहतूक शाखा येरवडा येथे घेऊन येत होता.
त्या टेम्पोच्या डाव्याबाजूला वाहतूक शाखेचा कर्मचारी बसलेला होता. आपल्या टेम्पोच्या फोटो काढला हे लक्षात येताच 'आता माझी सटकली' या फिल्मी आवेशात या वाहतूक कर्मचाऱ्याने सिग्नलवर थांबलेल्या या कारच्या चालकाकडे 'तुझे लायसेन्स आणि सारी कागदपत्र दाखव' अशी आज्ञा सोडली, चालकाने त्याचे लायसेन्स दाखविण्यासाठी काढत असताना त्याच बरोबर संबंधित वाहतूक कर्मचाऱ्याचे ओळखपत्र पाहण्यासाठी मागितले. दरम्यान या वाहतूक कर्मचाऱ्याने टेम्पोतील एकास जॅमर आणून कारला जॅमर लावण्याची आज्ञा दिली. नियमभंग केलेल्या आमच्या टेम्पोचा फोटो काढतो काय दाखवतोच आता तुम्हाला पोलिसी हिसका असा सगळा अविर्भाव त्या कर्मचाऱ्याचा होता.
'गाडीची सगळी कागदपत्र अवश्य पहा पण आमचा गुन्हा काय घडला ते सांगा' असे विचारल्यावर 'चला पोलीस स्टेशनला साहेबांना भेटा' असे त्या कर्मचाऱ्याने फर्मावले, गाडीतील कोणीही व्यक्ती त्या कर्मचाऱ्याशी अरे-तुरेच्या भाषेत बोललेले नसताना व सगळी कागदपत्र दाखवण्याचे सहकार्य करीत असतानाही आता वाहतूक शाखेचा कर्मचारी गाडीतील फोटो काढणारे सद्गृहस्थ त्याच्याशी अरेरावी करीत असल्याचा कांगावा करू लागला.
आपल्या टेम्पोने वाहतुकीचा नियम मोडलाय आणि त्याचा फोटो काढल्या गेलाय हे त्या कर्मचाऱ्याच्या जिव्हारी लागले होते. पण आपला गुन्हा लपवण्यासाठी सदर कर्मचारी पोलिसी दबाव तंत्राचा वापर करू लागला हे स्पष्टपणे दिसत होते. कारमधील सद्गृहस्थही खमके होते, त्यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद न घालता शांतपणे 'चला पोलीस स्टेशनला भेटू तुमच्या साहेबांना' असे म्हणून गाडीतून उतरून येरवडा पोलीस स्टेशनला गेले, काही वेळाने ते कर्मचारी महाशयही गाड्या चढउतार करणाऱ्या कामगार कम बाऊन्सर यांच्या गराड्यात टेम्पोतील त्या वाहतूक शाखेत पोहोचले.
गाडीतील सद्गृहस्थाने त्या वाहतूक पोलीस कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यास येथे प्रमुख कोण आहेत याची विचारणा केली असता साहेब जेवायला गेलेत असे उत्तर आले. बराच वेळ थांबूनही साहेब येण्याची चिन्हे दिसेनात, दरम्यान गाडीतील सद्गृहस्थ संबंधित कर्मचाऱ्याला शांतपणे 'आमचा गुन्हा घडलाय म्हणून तुम्ही आम्हाला येथे आणले आहे तर खटला दाखल करा' असे सांगत होते परंतु तो कर्मचारी मात्र नळावरील बायकांच्या भांडणाचा आवेशात त्या सद्गृहस्थांशी वाद घालीत होता. अखेरीस त्या कर्मचाऱ्याच्या सिनिअरने त्या कर्मचाऱ्यास काय झाले विचारल्यानंतर, आपल्या गाड्यांना (दुचाकी उचलणाऱ्या टेम्पोना) उलट दिशेने यायला साहेबांनी परवानगी दिलेली आहे आणि तरीही यांनी आपल्या गाडीचे फोटो काढले हे सांगावे लागले आणि नंतर मग कार चालकाचे लायसेन्स आणि इतर सर्व कागदपत्र पाहायला मागितल्याने आणि साहेबाला भेटायला म्हणून पोलीस स्टेशनला बोलावल्याचे सांगितले.
त्या कर्मचाऱ्याचा सिनिअर बहुदा अनुभवी आणि समजदार असावा, त्याने काय घडले आणि पुढे काय घडेल हे लक्षात घेऊन त्या कर्मचाऱ्यास लायसेन्स परत करायला सांगितले, कारमधल्या लोकांना जायला सांगून विषय मिटवला. ती लोकही लांबचा प्रवास असल्याने तेथून निघून गेली....
पण आता हा विषय त्या सद्गृहस्थांनी सोडून दिला असेल का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा