मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

 दुसरा दृष्टीकोन:

आदिवासी जमातींना भेटी देऊन त्यांच्यात काम करण्याचे फॅड गेले काही दशकापासून होत आहे. काही अपवाद वगळल्यास आदिवासी पर्यटन होत आहे.
कोणीतरी रिटायर झालेले काका उर्वरित काळ आता आदिवासींच्या उध्दाराची जबाबदारी आपल्यावर येऊन पडल्याच्या अविर्भावात आदिवासींच्या उद्धाराचे महत्कार्य करीत असतात, त्यांच्या अवती भवती असणाऱ्या गरगरीत बरण्यांचे मंडळ, काही सेवनिवृत्तांचे मंडळ यांना घेउन हे काका या पर्यटनाचे काम करीत असतात.
गेली अनेक दशके मेळघाटात सेवाकार्य करूनही त्या भागातील आदिवासींची अवस्था तशीच आहे, त्यात काही बदल घडला असता तर रोज नव्या दमाने तेथे जाणाऱ्या समाजसेवी संस्था कशाला दिसतील, पण जवळपास माणसामागे एक समाजसेवी संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात तेथे समाजसेवी संस्था काम करीत आहेत. रोज नव्या दमाने तिथल्या आदिवासींचे प्रश्न पुण्या-मुंबईच्या लोकांपुढे मांडल्या जातात. आदिवासींच्या सहानुभूतीचा धंदा अनेकांचा झाला आहे.
असो....

माझा दृष्टिकोन वेगळाच आहे.
आपण जातो आदिवासींचे प्रश्न सोडवायला, पण त्या आधी आपले स्वतः चे प्रश्न खरंच सुटले आहेत का? बिगर आदिवासी समाजापुढे आता काहीच प्रश्न उरले नाहीत का? हे स्वतःला एकदा विचारले पाहिजे.

आता मी काही तुलना करतो,
मुलगा होत नाही म्हणुन सासरच्या लोकांनी सुनेचा छळ करणे, मुलगी असलेला गर्भ पोटातच मारून टाकण्याचे प्रमाण, दाग-दागिने, गाडी बंगला यासाठी सुनेचा छळ, नवरा -बायकोचे पटत नाही म्हणून घटस्फोटांचे प्रमाण, किंवा घटस्फोट घेण्याचे धारिष्ट्य नसल्याने रोज होणारी नवरा बायकोची भांडणे आणि धुसफूस, आपले इतरांबरोबरचे संबंध, बहीण-भाऊ, दीर-भावजय, जावा-जावा, सासू-सून, नणंद-भावजय, शेजारी-पाजारी, आप्त-स्वकीय इत्यादी यांच्या बरोबर कसे आहेत, भौतिक सुखसोयीसाठी हपापले पणा आणि त्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब, अनैतिकता इत्यादी यासर्व गोष्टी आपल्या पुढारलेल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र याच गोष्टी तुम्हाला आदिवासी समाजामध्ये अपवादानेही दिसणार नाही.

मग प्रगत समाज कोणता समजायचा? आणि अप्रगत समाज कोणाला म्हणायचे? कोणी कोणाचे प्रश्न सोडवायला जायचे?

खरं तर आदिवासी पाडे वस्त्यांना भेट देऊन त्यांचे जीवन पाहून स्वतःचे प्रश्न सोडवता येतील, नवरा-बायको, सासू-सून, नणंद-भावजय इत्यादी एकमेकांशी चांगले संबंध कसे ठेवावेत? घटस्फोटांचे प्रमाण शून्यावर कसे असावे? कमीत कमी गरजा मध्येही आनंदी कसे जगावे. भौतिक महत्वाकांक्षा, मोह, लोभ यापासून दूर कसे राहावे, शुद्ध सात्त्विक कसे जगावे याचा वस्तुपाठ घेण्यासाठी खरे तर इथे भेटी दिल्या पाहिजेत, या भेटीतून आपले प्रश्न कसे सोडवता येतील हे पहिले पाहिजे, पण आपण इतके अहंकारी आणि दांभिक असतो की जणू आपल्याला काही प्रश्नच नाहीत, आपले कसे अगदी उत्तम चालले आहे असा आभास निर्माण करतो, आणि स्वतःची फसवणूक करून घेत असतो. या भ्रमातून लवकर बाहेर पडले पाहिजे.

राजेंद्र धारणकर

 स्थळ: येरवडा पोलीस स्टेशन जवळ वाहतूक शाखा

वेळ: दुपारी सव्वा दोन ते अडीच च्या सुमारास दिनांक 14/09/2022

या ठिकाणी दुपारी एका कारमधून एक महिला आणि दोन पुरुष प्रवास करीत असताना येरवडा पोलीस स्टेशन पुढील चौकात सिग्नलवर थांबलेले होते. त्याच वेळेस समोरून नो एंट्रीतून एक टेम्पो समोरून येताना दिसल्याने त्या कारमध्ये पुढे बसलेल्या सद्गृहस्थाने वाहतुकीचा नियम तोडून येणाऱ्या टेम्पोचा फोटो काढला. हा टेम्पो नो पार्किंग मधल्या गाड्या उचलून वाहतूक शाखा येरवडा येथे घेऊन येत होता.

त्या टेम्पोच्या डाव्याबाजूला वाहतूक शाखेचा कर्मचारी बसलेला होता. आपल्या टेम्पोच्या फोटो काढला हे लक्षात येताच 'आता माझी सटकली' या फिल्मी आवेशात या वाहतूक कर्मचाऱ्याने सिग्नलवर थांबलेल्या या कारच्या चालकाकडे 'तुझे लायसेन्स आणि सारी कागदपत्र दाखव' अशी आज्ञा सोडली, चालकाने त्याचे लायसेन्स दाखविण्यासाठी काढत असताना त्याच बरोबर संबंधित वाहतूक कर्मचाऱ्याचे ओळखपत्र पाहण्यासाठी मागितले. दरम्यान या वाहतूक कर्मचाऱ्याने टेम्पोतील एकास जॅमर आणून कारला जॅमर लावण्याची आज्ञा दिली. नियमभंग केलेल्या आमच्या टेम्पोचा फोटो काढतो काय दाखवतोच आता तुम्हाला पोलिसी हिसका असा सगळा अविर्भाव त्या कर्मचाऱ्याचा होता.

'गाडीची सगळी कागदपत्र अवश्य पहा पण आमचा गुन्हा काय घडला ते सांगा' असे विचारल्यावर 'चला पोलीस स्टेशनला साहेबांना भेटा' असे त्या कर्मचाऱ्याने फर्मावले, गाडीतील कोणीही व्यक्ती त्या कर्मचाऱ्याशी अरे-तुरेच्या भाषेत बोललेले नसताना व सगळी कागदपत्र दाखवण्याचे सहकार्य करीत असतानाही आता वाहतूक शाखेचा कर्मचारी गाडीतील फोटो काढणारे सद्गृहस्थ त्याच्याशी अरेरावी करीत असल्याचा कांगावा करू लागला.

आपल्या टेम्पोने वाहतुकीचा नियम मोडलाय आणि त्याचा फोटो काढल्या गेलाय हे त्या कर्मचाऱ्याच्या जिव्हारी लागले होते. पण आपला गुन्हा लपवण्यासाठी सदर कर्मचारी पोलिसी दबाव तंत्राचा वापर करू लागला हे स्पष्टपणे दिसत होते. कारमधील सद्गृहस्थही खमके होते, त्यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद न घालता शांतपणे 'चला पोलीस स्टेशनला भेटू तुमच्या साहेबांना' असे म्हणून गाडीतून उतरून येरवडा पोलीस स्टेशनला गेले, काही वेळाने ते कर्मचारी महाशयही गाड्या चढउतार करणाऱ्या कामगार कम बाऊन्सर यांच्या गराड्यात टेम्पोतील त्या वाहतूक शाखेत पोहोचले.

गाडीतील सद्गृहस्थाने त्या वाहतूक पोलीस कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यास येथे प्रमुख कोण आहेत याची विचारणा केली असता साहेब जेवायला गेलेत असे उत्तर आले. बराच वेळ थांबूनही साहेब येण्याची चिन्हे दिसेनात, दरम्यान गाडीतील सद्गृहस्थ संबंधित कर्मचाऱ्याला शांतपणे 'आमचा गुन्हा घडलाय म्हणून तुम्ही आम्हाला येथे आणले आहे तर खटला दाखल करा' असे सांगत होते परंतु तो कर्मचारी मात्र नळावरील बायकांच्या भांडणाचा आवेशात त्या सद्गृहस्थांशी वाद घालीत होता. अखेरीस त्या कर्मचाऱ्याच्या सिनिअरने त्या कर्मचाऱ्यास काय झाले विचारल्यानंतर, आपल्या गाड्यांना (दुचाकी उचलणाऱ्या टेम्पोना) उलट दिशेने यायला साहेबांनी परवानगी दिलेली आहे आणि तरीही यांनी आपल्या गाडीचे फोटो काढले हे सांगावे लागले आणि नंतर मग कार चालकाचे लायसेन्स आणि इतर सर्व कागदपत्र पाहायला मागितल्याने आणि साहेबाला भेटायला म्हणून पोलीस स्टेशनला बोलावल्याचे सांगितले.

त्या कर्मचाऱ्याचा सिनिअर बहुदा अनुभवी आणि समजदार असावा, त्याने काय घडले आणि पुढे काय घडेल हे लक्षात घेऊन त्या कर्मचाऱ्यास लायसेन्स परत करायला सांगितले, कारमधल्या लोकांना जायला सांगून विषय मिटवला. ती लोकही लांबचा प्रवास असल्याने तेथून निघून गेली....

पण आता हा विषय त्या सद्गृहस्थांनी सोडून दिला असेल का?

 हरामखोर..!

    हरामखोर हा शब्द मी अजिबात वापरणार नाही. अनेकांच्या मनात हा शब्द असला, तरी हा शब्द शिवी सदृश्य असल्याने मी तरी वापरणार नाही. वाहनांना टोल भरण्यासाठी fastag अनिवार्य केले आहे. Fastag नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. मुळात भारतातील टोल हे ताबडतोब बंद व्हायला हवेत ही माझी मागणी व अनेक भारतीयांची भावना आहे. जे टोल रोड आहेत ते खाजगी मालकीचे करायला हरकत नाही. मात्र टोल ही प्रथा सुरू होण्यापूर्वी जे रस्ते, महामार्ग होते ते आम्हा भारतीय नागरिकांना पूर्वीप्रमाणे विना टोल वापरण्यासाठी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ज्या लोकांना यापेक्षा वेगळे किंवा अधिक चांगले मार्ग हवेत त्यांनी तयार करावेत त्यावर टोल घ्यावा यासाठी कुठलाही आक्षेप असायचे कारण नाही परंतु भारतीय नागरिक देश चालवण्यासाठी जो कर भरतात त्या करांमध्ये भारतातले रस्ते वापरण्याची मुभा ही आहेच, याशिवाय वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनावरचा जीएसटी, 15 वर्ष आगाऊ रोड टॅक्स असे टॅक्स वाहनधारकांकडून सरकारला मिळालेले असतातच. मात्र अतिशय चतुराईने आणि शिताफीने टोल नावाचा ब्रह्मराक्षस निर्माण करून तो भारतीयांच्या माथी मारला आहे. हा टोल मुळातच बंद झाला पाहिजे असे असताना, टोल ही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी fastag ही व्यवस्था आणली आहे. विद्यमान रस्ते वाहतूक मंत्री नितीन भाऊ आणि माझ्या वयात फारसे अंतर नाही. लहानपणी आम्ही 'नवा व्यापार' नावाचा खेळ खेळायचो या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे पटावर काही शहर, रेल्वे,बस, विज अशा काही कंपन्या या पटवरच्या चौकटीत असायच्या. त्या-त्या चौकटीत सोंगटी गेली की त्या चौकोनातील शहर कंपनी विकत घेता यायची. नंतर त्या खेळातले इतर खेळाडूची सोंगटी जर दुसऱ्या खेळाडूच्या घरात गेली तर त्या खेळाडूला ठरल्याप्रमाणे दंड किंवा टोल हा द्यावा लागायचा. फार मजेशीर खेल होता हा. आमच्या लहानपणी इतर दुसरे खेळ फारसे नसल्याने हा खेळ अनेक दिवस चालायचा माझ्या आणि माझ्या बरोबरीच्या वयातल्या लोकांच्या मनामध्ये या खेळाचं गारुड आहे. हेच गारुड बहुतेक नितीन भाऊंच्या मनात अजूनही असावे आणि तोच खेळ ते प्रत्यक्षात सध्या खेळत आहेत. 'सवाल म्हातारी मेल्याचे नाही काळ सोकावतो' असे म्हणतात. प्रश्न यथोचित कराचा किंवा टोलचा नाही, प्रश्न हा प्रवृत्तीचा आहे. सरकारची 'करा' व्यतिरिक्त टोल आकारणीची प्रवृत्ती हा नागरिकांच्या पैशावर उघड-उघड दरोडाच आहे. टोलच्या बाबतीत नितीन भाऊंचा युक्तिवाद काहीही जरी असला (तसेही नितीन भाऊ हजर जबाबी आणि बिनतोड युक्तिवादासाठी प्रसिद्ध आहेत) तरी एखाद्या व्यवहारांमध्ये बिनतोड युक्तिवाद करता आला किंवा बिनतोड युक्तिवाद करून समोरच्याला गप्प करता आले म्हणजे तो व्यवहार नैतिक आणि अधिकृत होतोच असे नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

    आमच्याच काळातला अतिशय गाजला चित्रपट म्हणजे 'शोले'. या शोले चित्रपटात गब्बरसिंग नावाचा दरोडेखोर असतो आणि तो त्याच्या क्षेत्रातील गावांमधून धन-धान्य जबरदस्तीने घेऊन जात असतो. याबाबतीत त्याचा प्रसिद्ध डायलॉग "गब्बर के तापसे तुम्हे एक ही आदमी बचा सकता है। और वो है खुद गब्बर। इसके बदलेमे मेरे आदमी तुमसे थोडा अनाज, थोडासा सामान लेते है तो कोई जुर्म करते है? कोई जुर्म नहीं, मै कहेता हू कोई जुर्म नही करते। अगर इसके बाद किसीने सर उठाया...." या डायलॉगचा आशय लक्षात घेतल्यास नितीन भाऊंचा टोलच्या बाबतीतला युक्तिवाद त्याच प्रकारचा असल्याचे लक्षात येईल. त्यामुळे ही टोलवसुली ही सरळ सरळ दरोडेखोरी प्रवृत्ती आहे. आणि या प्रवृत्तीला विरोध हा केलाच पाहिजे. आता Fastag च्या निमित्ताने लोकांच्या मनात टोल कायमस्वरूपी प्रस्थापित करण्याचा डाव आहे. कोणतीही नवीन योजना सुरू करताना ती योजना लोकांनी स्वीकारण्यासाठी त्या योजनेत सवलत देण्यात येते. ही सवलत सुरुवातीला 100% मोफत नंतर कमी करीत जाणे असे असते. मात्र Fastag च्या बाबतीत नकारात्मक योजना राबविण्यात येत आहे Fastag वापरणाऱ्यांना सवलत देऊन Fastag वापरणाऱ्यांचे प्रमाण 100% करण्या ऐवजी Fastag न वापरणाऱ्यांना दुप्पट टोल हे सुलतानी फर्मान काढण्यात आलेले आहे. आणि हे केवळ निषेधार्ह नसून अक्षम्यही आहे. आगामी काळात रोड टोल प्रमाणेच आणखीनही निरनिराळ्या गोष्टींवर टोल बसू शकतो, उदाहरणार्थ सकाळी सकाळी स्वच्छ हवेत फिरायला जाणारे, समुद्रकिनारी बसून अथांग समुद्र लाटा पाहणारे, नदीच्या किनाऱ्यावर बसून पाण्यात पाय टाकणारे यांच्यावरही टोल बसवल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. कारण कोणत्याही टोल वसुलीसाठी बिनतोड युक्तिवाद करण्यात नितीन भाऊंचा हात धरणारे कोणी नाही.

    जनमताचा कानोसा घेतलल्यास, टोल आकारणीच्या संदर्भात 'हरामखोर' हा शब्द सातत्याने कानावर पडतो. माझ्या लेखात मी हा शब्द वापरणार नाही, लिहिलं मी मला जे पाहिजे ते आता "घ्या काय उखडायचे ते उखडून" असा वाकप्रचारही मी वापरणार नाही,

    कारण नितीन भाऊंचा युक्तिवाद करण्यात जसा हातखंडा आहे, तसाच त्यांच्या विरुद्ध कोणी मतप्रदर्शन केल्यास त्यांच्याविरुद्ध अब्रु नुकसान भरपाईची दावे करण्यातही हातखंडा आहे. त्यामुळे असे शब्द वापरून मला माझ्यावर अब्रु नुकसान भरपाईचा दावा ओढवून घ्यायचा नाही. कारण असे खटले चालवणे यासाठी लागणारी वकिलांची फी व खर्च देण्याची ऐपत माझी नसल्याने मी या फंदात पडणार नाही.

    त्यामुळे माझ्या लेखात कोणाची बदनामी किंवा अवमान करण्याचा हेतू अजिबात नाही. चुकून माकून एखादा वावगा शब्द आढळल्यास संबंधितांनी मला माफ करावे.

राजेंद्र धारणकर
अध्यक्ष
सिस्कॉम (व्यवस्था सुधारणा मोहीम)
पुणे