माझी फजिती-भाग ५
प्रेरणा आणि सायकल शिकणे ...
-राजेंद्र धारणकर
आयुष्यात कोण कोणाकडून काय प्रेरणा घेईल काही
सांगता येत नाही. मलाही काही प्रेरणा मिळाल्याने माझ्याही आयुष्यात काही बदल घडला.
त्याची आवर्जून सांगावी अशी ही गोष्ट..
साधारणपणे ५वी ६वीच्या वयाच्या
टप्प्यावर मुलं सायकल (दुचाकी) चालवायला शिकतात. आमच्या मॉडर्न हायस्कूलच्या ग्राऊंडववर
मे महिन्याच्या सुट्टीत सायकल चालवायला शिकण्याच्या कार्यक्रम असायचा. माझ्या वर्गातले धनु संत, धनु भाटे हे मित्र सायकल चालवायला शिकवायचे, त्यांच्या
सायकली त्याकाळातल्या अॅटलस, फिलिप्स,ए-वन
अशा कंपनीच्या २४ इंची जडच्या-जड आणि मजबूत असायच्या. धनु संत त्यांची सायकल घेऊन
यायचा. आमच्या बहुतेकांकडे त्यावेळी सायकल नव्हती.
माझी उंची त्या सायकलपेक्षा खूप कमी होती, माझी शरीरयष्टीही बारीकच होती.
ज्याला सायकल शिकवायची त्याला सायकलच्या मधून दोन्ही पायडलवर पाय ठेवायला लावून
मागून सायकल धरायची, शिकणाराने पायडलवर पाय मारायचे. सुरवातीला कोणतेही जजमेंट नसल्याने पाय घसरणे,
बॅलन्स सांभाळता न आल्याने पडायचे, सायकल
बोकांडी पडायची. गुडघे फुटायचे, तोंड फुटायचं, हातापायाला लागायचं रक्त यायचं पण पुन्हा काही मिनिटात पोर पुन्हा सायकल
शिकायला सुरवात करायचे, ‘गुडघे फुटल्याशिवाय सायकल चालवायला
येत नाही’ असा वाक्प्रचारच त्यावेळेस होता. मी लहानपणी खूप
घाबरट, भेकड होतो त्यामुळे हा सगळा पडा-पडीचा प्रकार पाहून
मी जाम घाबरलो आणि घरी पळून आलो. सायकल चालवताना पडायच्या भीतीने मनात चांगलच घर
केल होत आणि त्याभीतीने सायकल चालवायला शिकायच
राहूनच गेल. ही घटना १९७१-७२ मधली.
कालांतराने मी ११वीत असताना म्हणजे १९७६ सालची गोष्ट.
आम्ही अकोल्यात कोल्हार-घोटी रस्त्यावर सारडा पेट्रोल पंपाच्या बाजूला राहायचो, त्या काळात रस्त्यावर रहदारी-वर्दळ
अशी काही नसायची, अगदी शेजारच्या सारडा पेट्रोल पंपावरही मुल खेळ खेळायचे. समोरच्या
बाजूला रस्त्याच्या पलीकडे सोसायटीची (विविध कार्य. सेवा सोसायटी) मोठी मोकळी जागा
होती. तेथे आमच्या समोरच्या आतल्या बाजूला राहणारी आमच्याच शाळेत असणारी आशा गोडसे नावाची १०वीतली मुलगी, सायकल शिकायची, दोन-चार
दिवसात सायकल शिकून मोठ्या ऐटीत ती आमच्या समोरच्या सोसायटीच्या जागेत, पंपावर भन्नाट सायकल चालवायची. तिला सायकल चालवताना पाहून माझा इकडे
जाळ-जाळ व्हायचा.
आमचं गाव त्यावेळी तसं खूप लहान, गावात
मुलीने सायकल चालवण असं नव्हतच. गावात एखाद्याने नवीन सायकल आणली तरी त्याची गावभर
चर्चा व्हायची असा तो काळ. आता ही पोरगी टेचीत माझ्या समोर सायकल चालवायची,
आणि मी पुरुषासारखा पुरुष असूनही (हाही पुरुषी अहंकार) मला सायकल चालवता
येत नाही, याची मला खूप चीड यायला लागली. माझा मलाच राग यायला
लागला. आपणही सायकल शिकली पाहिजे हे पक्क डोक्यात घेतल. पण आता या वयात (शरीर
वाढलेले, ऊंची-वजन वाढलेले) कोण सायकल शिकवणार? आणि आता जर
सायकल चालवताना पडलो तर? मनामध्ये विचारांचा हा कल्लोळ. पण
ऐटीत सायकल चालवणारी ती पोरगी माझ्या मनातल्या मनात मला खूप हिणवायची, खिजवयाची, खूप चिडचिड व्हायची. मग काहीही झालं तरी सायकल चालवायला शिकायचेच हा मनाशी चंग बांधला.
एके दिवशी मनाचा हिय्या केला आणि अगदी ८-१० वर्षाच्या लहान मुलांसाठी असलेल्या छोट्या चाकाची सायकल शरद खांबेकरच्या सायकल दुकानातून भाड्यानी आणली.
आमच्या घरापासून संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास एक फर्लांगाचा उतार होता.
त्या रस्तावर त्या छोट्या सायकलच्या सीटवर बसून सायकल उताराच्या बाजूला सोडून दिली, उभा राहिलो तरी दोन पायांमधून सायकल
आरामात खालून निघून जाईल इतक्या कमी
उंचीची सायकल, अशा सायकलवर अस्मादिक बसले. एवढी छोटी सायकल, पण त्या सायकलच्या पायडलवर पाय न ठेवता दोन्ही पायांनी मी सायकल वल्हवत
होतो. एवढ विचित्र आणि हास्यास्पद दिसत असेल ते ज्याचं नाव ते, लोक
माझ्याकडे पाहून हसायचे. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून, होणारी
अवहेलना गिळून सायकल शिकायचा उपक्रम मी चालू ठेवला. उतार संपला की सायकलवरून
उतरायचं आणि सायकल ढकलीत वर यायचं आणि पुन्हा उताराच्या दिशेनी... एकदा असचं चालू
असताना एक धोतर घातलेला माणूस समोरून येत होता, मला उतारावर
ती सायकल काही कंट्रोल झाली नाही, आणि त्या माणसाच्या दोन्ही
पायाच्या बरोब्बर मध्ये सायकलच चाक गेलं, व्हायचं तेच झालं, त्याला नको तिथे मार बसला, एव्हढा चिडला तो माणूस, त्याने मला धरून चांगला बद्कावला, धोपटला. आधीच
लहान पोरांची सायकल, एवढा मोठ्ठा घोडा झालेला मी, ती सायकलही मला चालवता येऊ नये, भररस्त्यात, गर्दीत खूप खूप फजिती झाली, मार खाल्ला.
पण त्यानंतर मी आमच्याकडे असलेली २४ इंची सायकलच्या मागच्या
कॅरीअर वर बसून पुन्हा तोच प्रयोग सुरु केला. हळू हळू बॅलन्सिंग जमायला लागलं. पाय
वर घेऊन पेडल मारता यायला लागले, मग अनेक दिवस मी कॅरीअर वर बसूनच सायकल चालवायचो, नंतर
कॅरीअरवरून सीटवर बसायचा प्रयत्न करायला लागलो, हळूहळू तेही
जमायला लागले. काही दिवसातच सीटवरून सायकल चांगली चालवायला शिकलो, हॅण्डलवरचा हासायकलिंगची मजा
घायला लागलो. तासंतास सायकल चालवायची जवळपासच्या गावांची भटकंती करायची. इतर
मित्रांबरोबर कधी-कधी आसपासची गाव, ठिकाण, संगमनेरलाही सायकलवर जाण होऊ लागल. अकोल्यापासून ५० मैल लांब
असलेल्या शिर्डीलाही अनेक रविवारी सायकलवरून प्रदक्षिणा झाल्या.
सायकल येत असल्यामुळे पुढे राजदूत, जावा-येझदी या मोटरसायकलही चालवता
यायला लागल्या.
आयुष्यात अनेक गोष्टी, अशा गोष्टी (ज्याला आजकाल लाईफ स्किल्स म्हणतात) वेळच्या
वेळी झाल्या नाही तर पुन्हा होत नाहीत, अनेकांना पोहोता येत नाही, डोंगर-दर्यात फिरायला भीती वाटते, अशा अनेक गोष्टी
त्यातली भीती काढून टाकून त्या केल्याच पाहिजेत, 65 वय
असलेला माझा मित्र अनिल आजही दुचाकी चालवीत नाही. आणि मग राहून राहून मनामध्ये हाच
विचार येतो की जर ती आशा नावाची मुलगी आमच्या समोर टेचीत सायकल चालवत नसती, तर सायकल चालवण्याची जिद्द, खुन्नस ही माझ्या मनात
कधीच निर्माण झाली नसती, तिच्याकडून प्रेरणा घेऊनच मी दुचाकी
चालवायला शिकलो हे मला आज जाहीररीत्या सांगायला काहीही संकोच वाटत नाही.
माझ्या पुरतीच आणि फक्त मलाच माहित असलेली ही गोष्ट
मी आज प्रकट करीत आहे. अप्रत्यक्षपणे मला
सायकल चालवण्याची प्रेरणा देणार्या त्या आशाला मन:पूर्वक धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा