जखमा ….
माझा मित्र शरद आणि मी घोटीला (इगतपुरी जवळ) शरदच्या मोटारसायकल वर अकोल्याहून निघालो. राजूर सोडले पुढे साधारण वाकी पर्यंत पोहोचलो असू, समोर लांबवर लक्ष गेले संपूर्ण आकाश ढगांनी काळवंडले होते. साधारण दुपारचे दोन वाजले असतील, एकूण अंदाज घेतला पुढे प्रचंड पावसाची शक्यता होती. घोटीला जाऊन रात्री परत येणे अशक्य वाटत होते. मध्ये पावसातही किमान २, ३ तास भिजावे लागले असते. त्या पेक्षा परत फिरावे हा निर्णय आम्ही घेतला. व माघारी फिरलो. परत निघताना शरदला गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून त्याने माझ्याकडे गाडी दिली.
मी गाडी चालवायला घेतली, गाडीला अजिबात ब्रेक नव्हते. शरदला त्याची सवय होती. मी गाडी चालवायला घेतल्या नंतर मी ब्रेकचा साधारण अंदाज घेऊन त्यानुसार गाडी ब्रेक व गियर वर कंट्रोल करीत चालवीत होतो. गाडीचा वेग जेमतेमच होता. सर्व रस्ता वळणाचा आणि चढ उताराचा घाट रस्ता होता . एक मोठा उतार आणि वळणाच्या ठिकाणी आम्ही आलो रस्त्याच्या उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला दरी, पुढे रस्त्याच्या कडेला मोठे दगड फोडून खडीकरणाचे काम चालू होते. मी माझ्या कंट्रोल मध्ये गाडी चालवीत होतो. उताराच्या वळणावरून गाडी चालली होती, शरदला अचानक भीती वाटली आणि त्यांनी माझे दोन्ही खांदे घट्ट धरून मला राजू ब्रेक, राजू ब्रेक करीत मला गाडी हळू करायला सांगू लागला. शरदने माझे खांदे घट्ट धरल्याने मला गाडी वळवता आली नाही आणि गाडी अगदी समोर अडीच तीन फुटी मोठ्या दगडावर जाऊन आदळली.
मी गाडीवरून पुढे दगडावर आपटलो शरद मागच्या मागे पडला . आसपास आठ दहा मजूर दगड फोडायचे काम करीत होते ते लगेच जवळ आले. जेवढ्या वेगाने ते माझ्याजवळ आले तेवढ्याच वेगाने ते मागे पळाले. माझ्या कपाळावरून खाली गरम काही तरी येतंय याची जाणीव झाली हात लावून पाहिलं तर ते रक्त होत. माझे डोके फुटले होते. कपाळाच्या वर पूर्ण कपाळाच्या लांबीची खोल जखम झाली होती . डोक्यावरची कातडी पूर्ण फाटून कवटी उघडी पडली होती . त्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, पांढरी कवटी त्यावरून वाहणारे रक्त पाहून मदतीला धावून आलेले ते मजूर माझी भयानक अवस्था पाहून मागे झाले. शरदला विशेष लागले नव्हते तोही लगेच माझ्या जवळ आला त्याने मला पाहिले, मनातून खूपच घाबरला, मला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी एखादी गाडी थांबवावी म्हणून रस्त्यावर जाऊन उभा राहीला . सर्वच जण माझ्याकडे खूपच भेदरल्या नजरेने पाहत होते पण जवळ कोणी येत नव्हते. डोक्यावरून रक्त खूपच येत होते, माझ्याकडे एक उपरणे होते ते मी काढले जवळच्या एकाकडे दिले त्याला म्हणालो डोक्यावरच्या जखमेवर ठेव, त्याने हातातून उपरणे घेतले डोक्यावर ठेवताना त्याचा हात खुपच थरथरायला लागला . मी अंदाजाने उपराण्याची घडी जखमेवर ठेवली, रक्त थांबावे म्हणून उपरण्याची घडी हाताने दाबून धरली . हाताच्या प्रत्येक बोटाला रक्ताची धार लागली. मला एकूण परिस्थितीचा अंदाज आला. माझे मीच स्वतःला सावरले. अर्थात दुसरा पर्यायही नव्हता . बहुतेक मला डोक्याला बसलेला मार, झालेली जखम,वाहणारे रक्त, उघडी पडलेली खोपडी पाहून बहुतेक मी काही क्षणाचा सोबती असावा असा प्रत्येकाचा अंदाज असल्याने सर्वच माझ्याकडे दयार्द नजरेने पहात होते पण जवळ यायला घाबरत होते.
चार पाच मिनिटाने एक जीपगाडी आली ड्रायव्हरने गाडी थांबवली पण माझा अवतार पाहून लगेच गाडी पळवली. माझ्या लक्षात आले मी रस्त्याकडे तोंड करून बसलो तर कोणीच थांबणार नाही म्हणून मी रस्त्याकडे पाठ करून बसलो. थोड्याच वेळात एका ट्रकचा आवाज येऊ लागला. शरदने तो ट्रक थांबवला ड्रायव्हरला काही विचार करायच्या आतच मी ट्रक मध्ये चढलो योगायोग की ट्रक मित्राचाच होता ड्रायव्हर रोजच्या परीचयातला होता पण मला पाहिल्यानंतर त्यानेही तोंड फिरवून घेतले. आम्ही राजूरला आलो माझ्या वडिलांच्या खूप जवळचे मित्र असलेल्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला आत बसायला सांगितले ते बाहेर काही पेशंट बरोबर बोलत होते. ते येई पर्यंत मी तेथे असलेल्या बेसिन जवळ गेलो, बेसिन वर आरसा होता. मी आरश्यात स्वतःला बघीतले एखाद्या गाडीचे बॉनेट उघडावे तसे माझे डोक्याचे झाले होते. मला पाहिलेल्या सगळ्यांचाच अंदाज मी काही जगणार नाही असा होता. परंतु योगयोग की मी पूर्ण शुद्धीवर होतो मला चक्कर आली नाही, मी बेशुद्ध पडलो नाही. थोड्या वेळाने डॉक्टर आले त्यांनी माझी जखम पहिली आणि मला सरकारी दवाखान्यात जायला सांगितले. बहुतेक त्यानाही माझ्या जखमा गंभीर वाटल्या असाव्यात.
शरदने एक जीप आणली, मला घेऊन तो सरकारी दवाखान्यात आला. सरकारी रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर दत्ता जुन्नरकर माझा वर्गमित्रच होता त्याने खूप चांगल्या पद्धतीने उपचार केले. डोक्याला कपाळाच्या वर अर्धचंद्राकृती सोळा सतरा टाके घातले. हनुवटीलाही चार टाके घातले . दोन तीन आठवडे रोज ड्रेसिंग केल्यानंतर जखमा भरून आल्या . दरम्यान सर्वच मित्र, नातेवाईक भेटून गेले.
डोक्यावरची अर्धचन्द्राची जखमेची खुण मला माझ्या वेगळ्याच शौर्याची प्रतिक वाटू लागली. डोक्यात हेल्मेट नसतानाही आणि डोक्याला भीषण मार बसूनही मी वाचलो होतो त्यामुळे एक प्रकारची बेफिकिरीची भावना बळावली. मोटारसायकल चालवताना हेल्मेट असण्याची काही गरज नाही हे माझ्या अपघातातून माझ्या पुरते सिद्ध झाले होते आणि मी ते फुशारकीने बोलूनही दाखवायला लागलो. हेल्मेट नसतानाही सहीसलामत बचावल्याची स्टोरी मी करू लागलो.
पुण्यात आल्यानंतर ग्राहक पंचायतीचे काम चालूच होते. एका वकिलाने मोटार वाहन कायद्यातील हेल्मेट सक्तीचा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयातून मिळवले. व त्यानुसार पुण्यात हेल्मेट सक्ती सुरु झाली. नेहमीप्रमाणे या हेल्मेट सक्तीला विरोधही सुरु झाला. ग्राहक पंचायतीचा हेल्मेट सक्तीला विरोध होता. मीही ग्राहक पंचायती सोबत हेल्मेट सक्ती विरोधात होतो. हेल्मेट सक्तीच्या विरोधासाठी निरनिराळे तर्क, वितर्क, युक्तिवाद झडत होते मीही त्यात हिरीरीने भाग घेत होतो. माझ्या डोक्यावरचा अर्धचंद्र दाखवत होतो. निसर्गाने / परमेश्वराने मुळातच एवढे चांगले हेल्मेट दिलेले असल्याने दुसरे हेल्मेट घालण्याची काहीही गरज नाही असे मी आग्रहाने सांगत असे. पुढे नाईलाजाने हेल्मेट घालायची वेळ आलीच तर I hate Helmet असे स्टीकर हेल्मेटला लावावे इथपर्यंत आम्ही आलो होतो. पण काही दिवसातच हेल्मेट सक्ती बारगळली. हेल्मेट सक्तीचा विषय मागे पडला.
काही दिवस गेले, हर्षल शिकायला पुण्यात आला. त्यानंतर कुशलही आला. हर्षु त्याच्या बाईक वर कॉलेजला जायचा. कुशल पहाटेच बसने जायचा, त्याला पायीही खूप चालायला लागायचं. संध्याकाळी क्लासलाही तो जायचा. दुपारी माझ्या ऑफिसला येउन तो मदतही करायचा. त्यालाही स्वतःची बाईक असावी असे खूप वाटायचे, खरे तर त्याला ती गरजही होतीच. पण अजून तो अठरा वर्षाचा नसल्याने त्याच्याकडे बाईक चालवायचे लायसेन्स नव्हते. तो कधी अठरा वर्षाचा होईल याची वाट पाहत होता. १५ सप्टेंबर २००५ ला अठरावा वाढदिवस साजरा करून त्याच दिवशी त्यानी लर्निंग लायसेन्स काढले. आता तो बाईक चालवायला लागला, गाडीवर संध्याकाळच्या क्लासला बाईक घेऊन जाऊ लागला.
दिनांक १५ डिसेंबर २००५ रात्री क्लास वरून परत येताना त्याला दुर्दैवी अपघात झाला, शरीराच्या कोणत्याही भागाला साधे खरचटले देखील नाही पण डोक्याला लागले. कपाळाचे हाड डोक्याच्या मध्यभागापर्यंत गेले, टाळू फुटली, मेंदू ज्या द्रवात तरंगत असतो तो सारा द्रव फुटलेल्या टाळू तून खाली गेला. डोळे गेले. तो कोमात गेला. त्याला जवळच्या पुना हॉस्पिटल मध्ये दाखल केलं. उपचार सुरु झाले. घरातही त्याची आई , आजी, काकू, आत्या सर्वजण परमेश्वराची प्रार्थना करीत होते. कोणी काही सांगितले की त्याप्रमाणे विधी , पूजा, प्रार्थना होऊ लागल्या. चार दिवस अहोरात्र त्याच्यावर उपचार चालू होते. चारही दिवस तो व्हेण्टिलेटर वर होता. दिनांक १८ डिसेंबर २००५ रोजी तो आम्हा सर्वाना सोडून गेला.
फक्त १८ वर्ष ३ महिने वय, काकू येतो ग ! सांगून रात्री क्लासला गेलेला कुशल परत आलाच नाही. काका मला तुमच्याकडून मस्तानी प्यायची चा किरकोळ हट्ट पूर्ण करायचा माझ्याकडून राहून गेला. त्याला जी आवडेल ती बाईक घेऊ म्हणून Hero होंडा, यामाहा, TVS सगळ्या शोरूम मध्ये गाड्या पाहिल्या होत्या. त्याला खूप काही करायचं होत, खूप काही व्हायचं होत. सार सार राहून गेलं.
तो गेला पण माझी झोप उडवून गेला. कित्येक महिने त्याच्या आठवणीने मी माझ्याशीच रडत होतो. त्याच्या आठवणी पेक्षाही मी व्याकुळ होत होतो तो या भावनेने की त्याच्या मृत्यूला केवळ मीच जबाबदार होतो. माझ्या नादान पणामुळे तो गेला.
माझा अपघात झाला तो १९९५ मध्ये, डोक्यात हेल्मेट नसतानाही मी सहीसलामत वाचलो होतो. त्यामुळे हेल्मेट नसले तरी काही होत नाही, आणि काही बरेवाईट व्हायचेच असेल तर ते हेल्मेट घातले तरी होऊ शकते. अशा विचारांचा ठाम पगडा असल्याने मी हेल्मेट आणलेही नव्हते. माझ्या घरात हेल्मेट नव्हते. साहजिकच मी हेल्मेट च्या विरोधी असल्याने इतरांना हेल्मेट घाला सांगण्याचा प्रश्नच येत नव्हता.
मीच हेल्मेट घालीत नव्हतो त्यामुळे मी कुशललाही कधी हेल्मेट घाल असे सांगितले नाही. त्यामुळे त्यानेही कधी हेल्मेट घातले नाही.
मी हेल्मेट सक्ती कडे फक्त एकाच बाजू ने पहिले त्याची दुसरी बाजू मी कधी तपासलीच नाही. मला जर हेल्मेटची सवय असती, हेल्मेटच्या उपयुक्तते बद्दल सकारात्मक दृष्टीकोन असता, तर मी कुशलला हेल्मेट शिवाय बाईक चालवू दिली नसती. त्याच्या डोक्यावर जर हेल्मेट असते तर !!!!
त्याच्या अपघाती मृत्यूला मीच जबाबदार आहे या जाणिवेनी मी कासावीस होतो. स्वतःला शिक्षा करून घेण्याच धारीष्ट्यहि माझ्याकडे नाही.
एके काळी हेल्मेट सक्ती विरोधात मोर्चा काढणे, आंदोलनात भाग घेणे, I hate Helemt चे स्टिकर लावून हेल्मेट सक्तीला विरोध करणारा मी, मला हेल्मेटच्या विरोधाची, हेल्मेट न घालण्याची जबर किंमत मोजावी लागली. Prevention is better than cure! चा खरा अर्थ कळायला माझा एक अपघात अपुरा ठरला.
आपल्या आयुष्यात अशा निनिराळ्या प्रकारचे, निनिराळ्या क्षेत्रातले अपघात रोजच घडत असतात. त्या अपघातातून आपण काही शिकतो का ? असे अप्रिय प्रसंग, निरनिराळ्या क्षेत्रातील आपली फसवणूक कशी टाळता येतील ? काय असायला हवे काय नको ? SYSTEM कशी असायला हवी ? कशी नको ? System चे सर्वाना चांगले फायदे कसे होऊ शकतील ? याची व्यापक अर्थाने, सकारात्मक, रचनात्मक मांडणी समाजापुढे आणली पाहिजे. केवळ व्यवस्था सदोष आहेत, भ्रष्ट आहेत असे म्हणून चालणार नाही. तर त्यातील दोष, उणीवा दूर करून आवश्यकता भासल्यास गरजेनुसार नवीन व्यवस्था निर्माण करून काम केले पाहिजे. SYSTEM CORRECTING MOVEMENT (व्यवस्था सुधारणारी मोहीम ) हा त्याचाच एक भाग आहे. देशातील सर्वच समाज धुरिणांना आज न उद्या याच मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे यात शंका नाही. आपणा सर्वांचे SYSCOM मध्ये स्वागतच आहे.