मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

 दुसरा दृष्टीकोन:

आदिवासी जमातींना भेटी देऊन त्यांच्यात काम करण्याचे फॅड गेले काही दशकापासून होत आहे. काही अपवाद वगळल्यास आदिवासी पर्यटन होत आहे.
कोणीतरी रिटायर झालेले काका उर्वरित काळ आता आदिवासींच्या उध्दाराची जबाबदारी आपल्यावर येऊन पडल्याच्या अविर्भावात आदिवासींच्या उद्धाराचे महत्कार्य करीत असतात, त्यांच्या अवती भवती असणाऱ्या गरगरीत बरण्यांचे मंडळ, काही सेवनिवृत्तांचे मंडळ यांना घेउन हे काका या पर्यटनाचे काम करीत असतात.
गेली अनेक दशके मेळघाटात सेवाकार्य करूनही त्या भागातील आदिवासींची अवस्था तशीच आहे, त्यात काही बदल घडला असता तर रोज नव्या दमाने तेथे जाणाऱ्या समाजसेवी संस्था कशाला दिसतील, पण जवळपास माणसामागे एक समाजसेवी संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात तेथे समाजसेवी संस्था काम करीत आहेत. रोज नव्या दमाने तिथल्या आदिवासींचे प्रश्न पुण्या-मुंबईच्या लोकांपुढे मांडल्या जातात. आदिवासींच्या सहानुभूतीचा धंदा अनेकांचा झाला आहे.
असो....

माझा दृष्टिकोन वेगळाच आहे.
आपण जातो आदिवासींचे प्रश्न सोडवायला, पण त्या आधी आपले स्वतः चे प्रश्न खरंच सुटले आहेत का? बिगर आदिवासी समाजापुढे आता काहीच प्रश्न उरले नाहीत का? हे स्वतःला एकदा विचारले पाहिजे.

आता मी काही तुलना करतो,
मुलगा होत नाही म्हणुन सासरच्या लोकांनी सुनेचा छळ करणे, मुलगी असलेला गर्भ पोटातच मारून टाकण्याचे प्रमाण, दाग-दागिने, गाडी बंगला यासाठी सुनेचा छळ, नवरा -बायकोचे पटत नाही म्हणून घटस्फोटांचे प्रमाण, किंवा घटस्फोट घेण्याचे धारिष्ट्य नसल्याने रोज होणारी नवरा बायकोची भांडणे आणि धुसफूस, आपले इतरांबरोबरचे संबंध, बहीण-भाऊ, दीर-भावजय, जावा-जावा, सासू-सून, नणंद-भावजय, शेजारी-पाजारी, आप्त-स्वकीय इत्यादी यांच्या बरोबर कसे आहेत, भौतिक सुखसोयीसाठी हपापले पणा आणि त्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब, अनैतिकता इत्यादी यासर्व गोष्टी आपल्या पुढारलेल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र याच गोष्टी तुम्हाला आदिवासी समाजामध्ये अपवादानेही दिसणार नाही.

मग प्रगत समाज कोणता समजायचा? आणि अप्रगत समाज कोणाला म्हणायचे? कोणी कोणाचे प्रश्न सोडवायला जायचे?

खरं तर आदिवासी पाडे वस्त्यांना भेट देऊन त्यांचे जीवन पाहून स्वतःचे प्रश्न सोडवता येतील, नवरा-बायको, सासू-सून, नणंद-भावजय इत्यादी एकमेकांशी चांगले संबंध कसे ठेवावेत? घटस्फोटांचे प्रमाण शून्यावर कसे असावे? कमीत कमी गरजा मध्येही आनंदी कसे जगावे. भौतिक महत्वाकांक्षा, मोह, लोभ यापासून दूर कसे राहावे, शुद्ध सात्त्विक कसे जगावे याचा वस्तुपाठ घेण्यासाठी खरे तर इथे भेटी दिल्या पाहिजेत, या भेटीतून आपले प्रश्न कसे सोडवता येतील हे पहिले पाहिजे, पण आपण इतके अहंकारी आणि दांभिक असतो की जणू आपल्याला काही प्रश्नच नाहीत, आपले कसे अगदी उत्तम चालले आहे असा आभास निर्माण करतो, आणि स्वतःची फसवणूक करून घेत असतो. या भ्रमातून लवकर बाहेर पडले पाहिजे.

राजेंद्र धारणकर

 स्थळ: येरवडा पोलीस स्टेशन जवळ वाहतूक शाखा

वेळ: दुपारी सव्वा दोन ते अडीच च्या सुमारास दिनांक 14/09/2022

या ठिकाणी दुपारी एका कारमधून एक महिला आणि दोन पुरुष प्रवास करीत असताना येरवडा पोलीस स्टेशन पुढील चौकात सिग्नलवर थांबलेले होते. त्याच वेळेस समोरून नो एंट्रीतून एक टेम्पो समोरून येताना दिसल्याने त्या कारमध्ये पुढे बसलेल्या सद्गृहस्थाने वाहतुकीचा नियम तोडून येणाऱ्या टेम्पोचा फोटो काढला. हा टेम्पो नो पार्किंग मधल्या गाड्या उचलून वाहतूक शाखा येरवडा येथे घेऊन येत होता.

त्या टेम्पोच्या डाव्याबाजूला वाहतूक शाखेचा कर्मचारी बसलेला होता. आपल्या टेम्पोच्या फोटो काढला हे लक्षात येताच 'आता माझी सटकली' या फिल्मी आवेशात या वाहतूक कर्मचाऱ्याने सिग्नलवर थांबलेल्या या कारच्या चालकाकडे 'तुझे लायसेन्स आणि सारी कागदपत्र दाखव' अशी आज्ञा सोडली, चालकाने त्याचे लायसेन्स दाखविण्यासाठी काढत असताना त्याच बरोबर संबंधित वाहतूक कर्मचाऱ्याचे ओळखपत्र पाहण्यासाठी मागितले. दरम्यान या वाहतूक कर्मचाऱ्याने टेम्पोतील एकास जॅमर आणून कारला जॅमर लावण्याची आज्ञा दिली. नियमभंग केलेल्या आमच्या टेम्पोचा फोटो काढतो काय दाखवतोच आता तुम्हाला पोलिसी हिसका असा सगळा अविर्भाव त्या कर्मचाऱ्याचा होता.

'गाडीची सगळी कागदपत्र अवश्य पहा पण आमचा गुन्हा काय घडला ते सांगा' असे विचारल्यावर 'चला पोलीस स्टेशनला साहेबांना भेटा' असे त्या कर्मचाऱ्याने फर्मावले, गाडीतील कोणीही व्यक्ती त्या कर्मचाऱ्याशी अरे-तुरेच्या भाषेत बोललेले नसताना व सगळी कागदपत्र दाखवण्याचे सहकार्य करीत असतानाही आता वाहतूक शाखेचा कर्मचारी गाडीतील फोटो काढणारे सद्गृहस्थ त्याच्याशी अरेरावी करीत असल्याचा कांगावा करू लागला.

आपल्या टेम्पोने वाहतुकीचा नियम मोडलाय आणि त्याचा फोटो काढल्या गेलाय हे त्या कर्मचाऱ्याच्या जिव्हारी लागले होते. पण आपला गुन्हा लपवण्यासाठी सदर कर्मचारी पोलिसी दबाव तंत्राचा वापर करू लागला हे स्पष्टपणे दिसत होते. कारमधील सद्गृहस्थही खमके होते, त्यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद न घालता शांतपणे 'चला पोलीस स्टेशनला भेटू तुमच्या साहेबांना' असे म्हणून गाडीतून उतरून येरवडा पोलीस स्टेशनला गेले, काही वेळाने ते कर्मचारी महाशयही गाड्या चढउतार करणाऱ्या कामगार कम बाऊन्सर यांच्या गराड्यात टेम्पोतील त्या वाहतूक शाखेत पोहोचले.

गाडीतील सद्गृहस्थाने त्या वाहतूक पोलीस कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यास येथे प्रमुख कोण आहेत याची विचारणा केली असता साहेब जेवायला गेलेत असे उत्तर आले. बराच वेळ थांबूनही साहेब येण्याची चिन्हे दिसेनात, दरम्यान गाडीतील सद्गृहस्थ संबंधित कर्मचाऱ्याला शांतपणे 'आमचा गुन्हा घडलाय म्हणून तुम्ही आम्हाला येथे आणले आहे तर खटला दाखल करा' असे सांगत होते परंतु तो कर्मचारी मात्र नळावरील बायकांच्या भांडणाचा आवेशात त्या सद्गृहस्थांशी वाद घालीत होता. अखेरीस त्या कर्मचाऱ्याच्या सिनिअरने त्या कर्मचाऱ्यास काय झाले विचारल्यानंतर, आपल्या गाड्यांना (दुचाकी उचलणाऱ्या टेम्पोना) उलट दिशेने यायला साहेबांनी परवानगी दिलेली आहे आणि तरीही यांनी आपल्या गाडीचे फोटो काढले हे सांगावे लागले आणि नंतर मग कार चालकाचे लायसेन्स आणि इतर सर्व कागदपत्र पाहायला मागितल्याने आणि साहेबाला भेटायला म्हणून पोलीस स्टेशनला बोलावल्याचे सांगितले.

त्या कर्मचाऱ्याचा सिनिअर बहुदा अनुभवी आणि समजदार असावा, त्याने काय घडले आणि पुढे काय घडेल हे लक्षात घेऊन त्या कर्मचाऱ्यास लायसेन्स परत करायला सांगितले, कारमधल्या लोकांना जायला सांगून विषय मिटवला. ती लोकही लांबचा प्रवास असल्याने तेथून निघून गेली....

पण आता हा विषय त्या सद्गृहस्थांनी सोडून दिला असेल का?

 हरामखोर..!

    हरामखोर हा शब्द मी अजिबात वापरणार नाही. अनेकांच्या मनात हा शब्द असला, तरी हा शब्द शिवी सदृश्य असल्याने मी तरी वापरणार नाही. वाहनांना टोल भरण्यासाठी fastag अनिवार्य केले आहे. Fastag नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. मुळात भारतातील टोल हे ताबडतोब बंद व्हायला हवेत ही माझी मागणी व अनेक भारतीयांची भावना आहे. जे टोल रोड आहेत ते खाजगी मालकीचे करायला हरकत नाही. मात्र टोल ही प्रथा सुरू होण्यापूर्वी जे रस्ते, महामार्ग होते ते आम्हा भारतीय नागरिकांना पूर्वीप्रमाणे विना टोल वापरण्यासाठी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. ज्या लोकांना यापेक्षा वेगळे किंवा अधिक चांगले मार्ग हवेत त्यांनी तयार करावेत त्यावर टोल घ्यावा यासाठी कुठलाही आक्षेप असायचे कारण नाही परंतु भारतीय नागरिक देश चालवण्यासाठी जो कर भरतात त्या करांमध्ये भारतातले रस्ते वापरण्याची मुभा ही आहेच, याशिवाय वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनावरचा जीएसटी, 15 वर्ष आगाऊ रोड टॅक्स असे टॅक्स वाहनधारकांकडून सरकारला मिळालेले असतातच. मात्र अतिशय चतुराईने आणि शिताफीने टोल नावाचा ब्रह्मराक्षस निर्माण करून तो भारतीयांच्या माथी मारला आहे. हा टोल मुळातच बंद झाला पाहिजे असे असताना, टोल ही व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी fastag ही व्यवस्था आणली आहे. विद्यमान रस्ते वाहतूक मंत्री नितीन भाऊ आणि माझ्या वयात फारसे अंतर नाही. लहानपणी आम्ही 'नवा व्यापार' नावाचा खेळ खेळायचो या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे पटावर काही शहर, रेल्वे,बस, विज अशा काही कंपन्या या पटवरच्या चौकटीत असायच्या. त्या-त्या चौकटीत सोंगटी गेली की त्या चौकोनातील शहर कंपनी विकत घेता यायची. नंतर त्या खेळातले इतर खेळाडूची सोंगटी जर दुसऱ्या खेळाडूच्या घरात गेली तर त्या खेळाडूला ठरल्याप्रमाणे दंड किंवा टोल हा द्यावा लागायचा. फार मजेशीर खेल होता हा. आमच्या लहानपणी इतर दुसरे खेळ फारसे नसल्याने हा खेळ अनेक दिवस चालायचा माझ्या आणि माझ्या बरोबरीच्या वयातल्या लोकांच्या मनामध्ये या खेळाचं गारुड आहे. हेच गारुड बहुतेक नितीन भाऊंच्या मनात अजूनही असावे आणि तोच खेळ ते प्रत्यक्षात सध्या खेळत आहेत. 'सवाल म्हातारी मेल्याचे नाही काळ सोकावतो' असे म्हणतात. प्रश्न यथोचित कराचा किंवा टोलचा नाही, प्रश्न हा प्रवृत्तीचा आहे. सरकारची 'करा' व्यतिरिक्त टोल आकारणीची प्रवृत्ती हा नागरिकांच्या पैशावर उघड-उघड दरोडाच आहे. टोलच्या बाबतीत नितीन भाऊंचा युक्तिवाद काहीही जरी असला (तसेही नितीन भाऊ हजर जबाबी आणि बिनतोड युक्तिवादासाठी प्रसिद्ध आहेत) तरी एखाद्या व्यवहारांमध्ये बिनतोड युक्तिवाद करता आला किंवा बिनतोड युक्तिवाद करून समोरच्याला गप्प करता आले म्हणजे तो व्यवहार नैतिक आणि अधिकृत होतोच असे नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

    आमच्याच काळातला अतिशय गाजला चित्रपट म्हणजे 'शोले'. या शोले चित्रपटात गब्बरसिंग नावाचा दरोडेखोर असतो आणि तो त्याच्या क्षेत्रातील गावांमधून धन-धान्य जबरदस्तीने घेऊन जात असतो. याबाबतीत त्याचा प्रसिद्ध डायलॉग "गब्बर के तापसे तुम्हे एक ही आदमी बचा सकता है। और वो है खुद गब्बर। इसके बदलेमे मेरे आदमी तुमसे थोडा अनाज, थोडासा सामान लेते है तो कोई जुर्म करते है? कोई जुर्म नहीं, मै कहेता हू कोई जुर्म नही करते। अगर इसके बाद किसीने सर उठाया...." या डायलॉगचा आशय लक्षात घेतल्यास नितीन भाऊंचा टोलच्या बाबतीतला युक्तिवाद त्याच प्रकारचा असल्याचे लक्षात येईल. त्यामुळे ही टोलवसुली ही सरळ सरळ दरोडेखोरी प्रवृत्ती आहे. आणि या प्रवृत्तीला विरोध हा केलाच पाहिजे. आता Fastag च्या निमित्ताने लोकांच्या मनात टोल कायमस्वरूपी प्रस्थापित करण्याचा डाव आहे. कोणतीही नवीन योजना सुरू करताना ती योजना लोकांनी स्वीकारण्यासाठी त्या योजनेत सवलत देण्यात येते. ही सवलत सुरुवातीला 100% मोफत नंतर कमी करीत जाणे असे असते. मात्र Fastag च्या बाबतीत नकारात्मक योजना राबविण्यात येत आहे Fastag वापरणाऱ्यांना सवलत देऊन Fastag वापरणाऱ्यांचे प्रमाण 100% करण्या ऐवजी Fastag न वापरणाऱ्यांना दुप्पट टोल हे सुलतानी फर्मान काढण्यात आलेले आहे. आणि हे केवळ निषेधार्ह नसून अक्षम्यही आहे. आगामी काळात रोड टोल प्रमाणेच आणखीनही निरनिराळ्या गोष्टींवर टोल बसू शकतो, उदाहरणार्थ सकाळी सकाळी स्वच्छ हवेत फिरायला जाणारे, समुद्रकिनारी बसून अथांग समुद्र लाटा पाहणारे, नदीच्या किनाऱ्यावर बसून पाण्यात पाय टाकणारे यांच्यावरही टोल बसवल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. कारण कोणत्याही टोल वसुलीसाठी बिनतोड युक्तिवाद करण्यात नितीन भाऊंचा हात धरणारे कोणी नाही.

    जनमताचा कानोसा घेतलल्यास, टोल आकारणीच्या संदर्भात 'हरामखोर' हा शब्द सातत्याने कानावर पडतो. माझ्या लेखात मी हा शब्द वापरणार नाही, लिहिलं मी मला जे पाहिजे ते आता "घ्या काय उखडायचे ते उखडून" असा वाकप्रचारही मी वापरणार नाही,

    कारण नितीन भाऊंचा युक्तिवाद करण्यात जसा हातखंडा आहे, तसाच त्यांच्या विरुद्ध कोणी मतप्रदर्शन केल्यास त्यांच्याविरुद्ध अब्रु नुकसान भरपाईची दावे करण्यातही हातखंडा आहे. त्यामुळे असे शब्द वापरून मला माझ्यावर अब्रु नुकसान भरपाईचा दावा ओढवून घ्यायचा नाही. कारण असे खटले चालवणे यासाठी लागणारी वकिलांची फी व खर्च देण्याची ऐपत माझी नसल्याने मी या फंदात पडणार नाही.

    त्यामुळे माझ्या लेखात कोणाची बदनामी किंवा अवमान करण्याचा हेतू अजिबात नाही. चुकून माकून एखादा वावगा शब्द आढळल्यास संबंधितांनी मला माफ करावे.

राजेंद्र धारणकर
अध्यक्ष
सिस्कॉम (व्यवस्था सुधारणा मोहीम)
पुणे

गुरुवार, ३० जुलै, २०२०

संतोष,
तूझी "ते ही खरेच आहे. नाहीतर या वयात कोणी phd ते ही XLRi सारख्या top college मधून करायचे धाडस कोंनकरणार ?"
ही प्रतिक्रिया वाचली, त्यामुळे तू XLRi सारख्या top college मधून phd करतोय हे समजले. XLRi हे top college आहे हेही समजले.

सर्व प्रथम तू phd करतोय या साठी मनःपूर्वक सदिच्छा!

Ph.D. ही संशोधना साठी देण्यात येणारी पदवी आहे. माझे शिक्षण अल्पस्वल्प असल्याने सर्व ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, Ph.D.  धारकांविषयी माझ्या मनात अतीव आदर आहे. Ph.D. साठी प्रचंड बौद्धिक कष्ट करावे लागतात, संशोधन करावे लागते, मोठाच सवापसव्यय असतो याची मला कल्पना आहे.

नावाच्या आधी Dr लावणारे अनेक लोक माझ्या जवळच्या परिचयाचे आहेत काही मित्रही आहेत.
त्यामुळे त्यांच्या व अनेकांच्या Ph.D. चे किस्से, कहाण्या, अनुभव माहिती आहेत. काही गमतीशीर आहेत, काही मनापासून दाद द्याव्यात अशा आहेत तर काही चीड आणणाऱ्याही आहेत.

मी दहावीत असताना म्हणजे 1975-76 साली आम्हाला अनिल सहस्रबुद्धे नावाचे शिक्षक शिकवायला होते, ते त्याकाळात Ph.D. करीत होते. त्याकाळात साधनसामुग्री जी आता सहज उपलब्ध आहे ती अजिबात नव्हती. त्यांचा संशोधनाचा विषय 'चाळीस गाव डांग भाषा आणि व्याकरण' असा काहीसा होता. चाळीस गाव डांग म्हणजे आमच्या अकोले व शेजारील तालुक्याचे भागातील आदिवासी जमाती त्यात कोळी, महादेव कोळी, ठाकर इत्यादी जमाती येतात; यांची संस्कृती, त्यांची बोली भाषा, त्या भाषेचे व्याकरण असा तो विषय होता.

त्यामुळे त्यांना या जमातीच्या निरनिराळ्या सण, समारंभ, मयत, जन्म, यात्रा, जत्रा, त्यांचे देव, परंपरा इत्यादी याचा सखोल अभ्यास करावा लागत होता, त्यासाठी अशा कार्यक्रमांना हजेरी लावणे, ते अभ्यासणे, माहिती घेणे असा बराच उपद्व्याप करावा लागायचा, यांची भाषाही वेगळी असल्याने ती समजायला कठीण, कर्ता कर्म क्रियापद या तीन गोष्टी एकत्र आल्या की आपलं वाक्य बनतं, पण या आदिवासींची भाषाही वेगळी आणि व्याकरणही वेगळं त्यामुळे ती समजायलाही कठीण, काळ 1975-76चा त्याकाळात वाहनांची वानवा, या आदिवासी गावात जाण्यासाठी वाहने नसायची, या आदिवासी दुर्गम भागात वाड्या-वस्त्यांवर पोहोचायला रस्तेही नसायचे त्यामुळे मैलोनमैल चालणे, सायकल असा प्रवास करायला लागायचा, काही कार्यक्रम रात्री असायचे त्यामुळे त्या वाडी-वस्तीतच अनोळखी ठिकाणी मुक्काम करायचा. काही वर्षे प्रचंड शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि बौद्धिक कष्ट आमच्या या सहस्त्रबुद्धे सरांनी घेतले होते.

त्यात त्यांना आलेला एक गमतीशीर अनुभव त्यांनी सांगितला होता. आमचा तालुका आदिवासी तालुका, त्यामुळे तालुक्याचे आमदार आदिवासी राखीव गटातील, त्यावेळेस एक अतिशय सालस, विनम्र, निरागस, भाबडे असं व्यक्तिमत्व असलेले यशवंतराव भांगरे नावाचे शेंडी(भंडारदरा) गावचे आमदार होते. रस्त्याने चालताना (हो त्यावेळेस आमदार गल्ली बोळातून, रस्त्याने चालायचे, विधानसभा अधिवेशनासाठी मुंबईला जाताना-येताना एस.टी.च्या लाल डब्याने प्रवास करायचे) समोर अगदी दोन वर्षाच नागडं पोर जरी आले तरी दोन्ही हात जोडून नमस्कार करायचे, मोठ्यांना तर करायचेच. कधीही कोणत्याही प्रकारच्या मदतीला ते तत्पर असायचे. आमच्या सरांनी त्यांना भेटून ते आदिवासींच्या संस्कृती आणि भाषेवर Ph.D. करीत असल्याचे सांगून त्यांची मदत हवी असल्याचे सांगितले (सरांचा हेतू आमदार महाशय हे आदिवासी समाजाचे आहेत शिवाय लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना भाषा आणि संस्कृती या विषयी अधिक माहिती असेल व ती त्यांच्याकडून मिळेल ही अपेक्षा) त्यावर या महोदयांनीही मनापासून मदत करण्याच्या हेतूने सरांना तुम्ही मुंबईला या मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुमचे Ph.D. चे काम करून टाकू, तुम्ही निर्धास्त रहा, असे आश्वासन दिले. आमदार महोदयांचे शिक्षण जेमतेम असल्याने Ph.D. हा नेमका काय प्रकार आहे? याची माहिती नसल्याने परंतु मदत करण्याच्या आंतरिक भावनेने ते बोलून गेले. ऐसा भी होता है। यावर आम्ही खूप हसलोही होतो.

त्यानंतर एका कॉलेजचे प्राध्यापक आपल्या अगदी जवळचे असलेले तेही Ph.D. करीत होते, (त्या प्राध्यापकांवर एक कादंबरीही लिहिता येईल एवढं मटेरिअल आहे.) अनेक प्रयत्न करूनही त्यांना Ph.D. मिळत नव्हती, Ph.D. द्यावी असं त्यांचं काम बहुतेक नसावं, अनेक viva झाल्या पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. अगदी शेवटचा प्रयत्न त्यांनी कमिटी पुढे केला, ते कमिटीपुढे आले चक्क सगळ्यांच्या पाया पडले, आणि कळकळीने विनंती केली, माझी आई शेवटच्या घटका हॉस्पिटलमध्ये मोजती आहे, तिला तिच्या मृत्यूपूर्वी मला डॉक्टर झालेले पहायचे आहे, तिची शेवटची इच्छा आपण पूर्ण करावी म्हणून हात जोडले. Ph.D. पदरात पडून घेतली.

कॉलेजच्या शिक्षकांना (त्यांना बोलीभाषेत प्राध्यापक म्हणतात) Ph.D. केल्यानंतर दोन ते पाच वेतनवाढीचे फायदे दिल्या जातात हा मोठा आर्थिक लाभ असतो, बहुतेक सर्व प्राध्यापक (काही सन्मान्य अपवाद वगळता) हा आर्थिक लाभ डोळ्यासमोर ठेवूनच Ph.D. करतात.

चार-पाच प्राध्यापक माझ्याकडे Ph.D. करावी किंवा नाही? केल्यास काय व किती फायदे होतील? हे विचारण्यासाठी व चर्चा करण्यासाठी भेटून गेले. एक जण तर त्यासाठी खास नाशिकहुन आले होते. या प्राध्यापकांची भयानक चीड आली होती.
Ph.D. करण्यासाठी येणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्च, करावी लागणारी मेहनत (इंटरनेटवरून कॉपी-पेस्ट), शिल्लक नोकरीचे वर्ष, मिळणारा इन्क्रीमेंटचा फायदा याचा आर्थिक ताळमेळ घालू पाहत होते.

संशोधन- Ph.D साठीची आवश्यक बाब, संशोधनातून नवीन गोष्टी बाहेर याव्यात, नव्याने आकलन व्हावे, संशोधनाचा फायदा समाजाला व्हावा, उन्नती व्हावी, निसर्ग/पर्यावरणास मदत व्हावी अशी सर्वसाधारणपणे उद्दीष्टये असतात, असावीत पण या प्राध्यापक महाशयांचा हेतू हा केवळ आर्थिक स्वार्थाचाच होता.

दोन-तीन महितीतले प्राध्यापक रिटायर्ड होण्याच्या शेवटच्या महिन्यात Ph.D. मिळवून घेतली, कारण फक्त आर्थिक फायदा! त्यांनी केलेल्या संशोधनाच्या एक तासाचेही लेक्चर विद्यार्थ्यांपुढे झाले नाही. तर एका प्राध्यापकाने हाताखालच्या Ph.D. होल्डर प्राध्यापकाकडून Ph.D.चे सर्व काम उक्ता मोबदला ठरवून करवून घेतले.

Ph.D. करणारांमध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांची संख्या मोठी आहे, आणि त्याचे कारणही आहे. जे नेट-सेट नाहीत त्यांना Ph.D. कंपल्सरी केलेली होती. शिवाय प्राचार्य पदासाठीही Ph.D. आवश्यक ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांना प्राचार्य बनायचे त्यांनीही Ph.D. केल्या. मागील काही वर्षात अक्षरशः हजारो-लाखोंच्या संख्येत प्राध्यापकांच्या Ph.D. झालेल्या आहेत. या प्राध्यापकांच्या Ph.D. चे विषय हाही संशोधनाचा विषय ठरू शकतो.

*शासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांव्यतिरिक्त Ph.D. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खरे कौतुक आहे. कारण निव्वळ संशोधनाच्या हेतूने प्रामाणिकपणे केलेल्या त्या Ph.D. आहेत कारण त्यांना या प्राध्यापकांप्रमाणे डायरेक्ट कोणतेही आर्थीक फायदे नाहीत.*

Ph.D. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथाही लक्षणीय आहेत.

या विद्यार्थ्यांचे त्यांच्या गाईड कडून आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषणाचे किस्सेही चीड आणणारे आहेत. त्यावरही खूप लिहिता येईल. अशा प्रतिकूल स्थितीतही त्यांचे Ph.D. करणे खूपच कौतुकास्पद आहे.

आज Ph.D. केलेल्या लोकांची संख्या काही लाखात आहे, पण त्या लाखो Ph.D. चा सुयोग्य परिणाम समाजावर, आर्थिक व इतर गोष्टीत सर्वसामान्य माणसांना दिसत नाही. हेही तितकेच खरे आहे, या विषयावरही एक Ph. D. होऊ शकेल.

*राजेंद्र धारणकर*

गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

महागडे शिक्षण खालावलेला दर्जा...

        शिक्षण म्हणजे नेमके काय? कशासाठी? उपजीविका, भौतिक गरजा, पुस्तकी शिक्षण व्यावहारिक शिक्षण यातील दरी, यशस्वीता म्हणजे काय? त्याचे निकष काय? शिक्षणासाठी आपण काय काय मोजतो? ही आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेऊन किंवा त्याकडे दुर्लक्ष करून आधीची पिढी पुढच्या पिढीला शिक्षणात ढकलते.


          शिक्षित म्हणजे प्रतिष्ठित आणि अशिक्षित म्हणजे अप्रतिष्ठित असे मापदंड समाजात दृढ झाले आहेत. मी काही दिवसांपूर्वीच आलेली ही पोस्ट वाचली,

          फर्स्ट क्लास मिळवूनही ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही, ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही, ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं, ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही, जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात, ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

         आणि त्या तुलनेत-

            तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे, मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे, बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे, आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे, ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे.......

      मला भयानक आवडतात कारण..
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात.

         गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात..  "पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."

       थोडक्यात "गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी  नाही."
अशी ही पोस्ट एका अर्थाने पुस्तकी/बाजारू शिक्षणातला फोलपणा दाखवणारी आहे.

           शिक्षित असूनही स्वतःची उपजीविका करायला असमर्थ तरी प्रतिष्ठित, शिक्षण नसतानाही स्वतःच्या उपजीविकेबरोबर इतरांनाही पोट पाण्याला लावणारा मात्र आप्रितिष्ठित त्यामुळे एका विशिष्ट वर्गाने मोठ्या चलाखीने काही अपवाद वगळता पुस्तकी शिक्षणाला अवास्तव महत्व देऊन जन्माला आलेल्याने पुस्तकी शिक्षण नसल्यास आयुष्य वाया गेले अशा संकल्पनाना जन्म देऊन शिक्षण उद्योग मोठा केला.
महागड्या शिक्षणाचा फटका हा केवळ आर्थिक नाही, केवळ पालकांसाठीही नाही तर तो या देशालाही बसलेला आहे. एखाद्या महायुद्धाने जेवढे नुकसान होणार नाही त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आणि पुढच्या अनेक पिढ्यांना दुष्परिणाम भोगायला लाभेल इतके नुकसानीचे किंवा महागडे शिक्षण या अर्थाने याकडे पाहायला हवे.
शिक्षणाची परिणीती अर्थार्जनात व्हावी ही धारणा एखादे दोन टक्के सोडले तर सर्वांची आहे.
आज मी शिक्षित आहे, पदवीधर, उच्च शिक्षित आहे आणि बेरोजगार आहे अशांची संख्या अफाट आहे. बेरोजगार असण्याचे खापर हे त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांवर फोडले जाते आणी त्यात काही चुकीचे नाही. शिक्षणाने प्रगल्भता यावी, व्यक्तित्वाचा विकास व्हावा, आत्मोद्धार व्हावा, जीवनाचा अर्थ समजावा, जीवन सत्कारणी लागावे हे असायला हवे. शिक्षणाचा प्रारंभी उपयोग हा लिहिता वाचता येणे हा आहे. एकदा लिहिता वाचता येऊ लागले की निरनिराळ्या विषयांची आवड किंवा आवडीच्या विषयातील सखोल अभ्यास करून त्या विषयातील प्राविण्य मिळवता येऊ शकते.

          पारंपारीक व्यवसाय उदाहरणार्थ शेती, सुतार काम, लोहारकाम, रंगकाम, शिलाईकाम असे अनेक व्यवसाय पारंपरिकपणे आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीला मिळाले, त्यासाठी कोणतेही शाळा/कॉलेजच्या पठडीतले किंवा बाह्य शिक्षणाची गरज पडली नाही किंवा भासत नाही. आजही अनेक तरुण शिक्षणातल्या पदवीच्या भेंडोळ्या घेऊन बाहेर आल्यानंतर त्याच्या या पारंपरिक व्यवसायात सहजपणे काम करू शकतात. पण या पारंपारीक व्यवसायाखेरीज इतर व्यवसायही मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत असल्याने  मोठ्या संख्येने मुलं अशा व्यवसायासाठी आवश्यक ते शिक्षण घेण्यासाठी आणि पालक त्यांना ते शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि मग सुरू होतो शिक्षणाचा खेळ, मग त्यासाठी शाळेची निवड, माध्यमाची निवड, त्यासाठी अवाढव्य-अवास्तव फी, बाहेरचे क्लासेस आणि इतर अनावश्यक खर्च. आणि हे सारे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक अशा साधारण 10 वी पर्यंतच्या शिक्षणासाठीच पालकांचा लाखो रुपयात खर्च होतो. बर या शिक्षणातून काय मिळतं, तर भाषा, विज्ञान, गणित व इतर विषयांचं बेसिक ज्ञान. इथपर्यंत आल्यानंतरही त्या मुलाला या शिक्षणातून विशिष्ट काही काम करता येईल उपजीविका साधता येईल अशा प्रकारचा काहीही अभ्यासक्रमात समावेश नसतो. काही अपदात्मक शाळांमध्ये आठवी पासून काही व्यवसाय अभ्यासक्रम शिकवल्या जातात पण त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य अस आहे. 10वी नंतर शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या मुलांची संख्या देखील खूप मोठी आहे. म्हणजेच साधारण 12 वर्ष पठडीबंद शिक्षणातूनही काही न मिळाल्याची भावना या मुलांची आणि त्यांच्या पालकांची असते. बारावी आणि त्यानंतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांचीही अवस्था काही वेगळी नसते. विशिष्ट विषयातली पदवी घेतल्यानंतरही त्या शिक्षणाचं काय करायचं? हे या मुलांना उमगत नाही, ते केवळ त्यांच्या पदवीच्या (शिक्षणाच्या नाही) आधारे नोकरी मिळवण्याच्या मागे लागतात. जसजसे शिक्षण पुढे जाऊ लागते तसतसे त्या मुलाला शारीरिक श्रमाच्या कामा ऐवजी किंवा ज्या कामात शारीरिक श्रम आहेत ते काम माझ्या योग्यतेच नाही ही धारणा तयार होते. त्यामुळे फक्त चार भिंतीच्या आतलं किंवा केबिनमध्ये साहेबी थाटाचच काम मिळालं पाहिजे व पदवी मिळाली म्हणजे तो हक्क मिळाला अशा मानसिकता विद्यार्थी आणि पालकांच्या होतात. आणि नेमकी इथेच फसगत होते. 'खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी' अशा मानसिकतेतून ही मुलं बाहेर पडत नाहीत आणि मग 'तेलही गेलं तूपही गेलं...' अशी स्थिती येते.

           आपल्या देशात दरवर्षी सव्वा ते दीड कोटी मुलं जन्माला येतात, व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर भारताच्या मार्केट मध्ये सव्वा ते दीड कोटी नवीन ग्राहक जन्माला येतात, दोन-तीन वर्षानंतर हे एज्युकेशन इंडस्ट्रीचे ग्राहक होतात. पूर्व प्राथमिक चे 2 वर्ष आणि पदवी पर्यंतचे 15 ते 16 वर्ष अशी साधारण 17 ते 18 वर्ष शिक्षणाची आणि प्रत्येक इयत्तेत सव्वा ते दीड कोटी या नुसार दरवर्षी जवळपास 22  ते 27 कोटी कायमस्वरूपी ग्राहक या इंडस्ट्रीला मिळतात. आता प्रत्येक विद्यार्थामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणारा खर्च, त्याच्या पालकांचा व इतरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागातील वेळ व खर्च या सर्वाचा हिशोब मांडल्यास पंचवीस ते तीस लाख कोटी रुपयांची उलाढाल या इंडस्ट्री मध्ये होत आहे. माझ्या या आकडेवारीला कोणताही अधिकृत आधार नाही, परंतु आपल्या देशातील जन्मदर, दरवर्षी वाढणारी लोकसंख्या, शाळांची फी, शालेय साहित्य, परीक्षा, वाहतूक, युनिफॉर्म इत्यादी नुसार हिशोब मांडला तरी आकडेवारी स्पष्ट होईल. दरवर्षी 25 कोटी विद्यार्थ्यामागे सरासरी एक लाख इतका खर्च धरला आणि पदवी पर्यंत शिक्षणाची 15 वर्ष धरली तर साधारण 375 लाख कोटी इतका खर्च आपण पदवी पर्यंतच शिक्षण प्राप्त करण्यासाठी करतो. एवढा प्रचंड खर्च केल्यानंतर दरवर्षी साधारण एक कोटी संख्येने बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची अवस्था काय आहे. पदवी साठी आपण(विद्यापीठ) फक्त त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा घेतो. पण सोळा/सतरा वर्षाच्या पठडीबंद शिक्षणानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात का? पुढचं जीवन जगण्यासाठीचा आत्मविश्वास त्यांना त्या शिक्षणातून मिळाला का? या शिक्षणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली का? या शिक्षणातून किमान देशाचे आदर्श नागरिक घडलेत का? या आणि अशा इतर परीक्षा आपण घेत नाही. त्यामुळे केवळ पदवीची कागदी भेंडोळी, फुसका बढेजावं, अहंगंड(superiority complex) असलेली मोठी संख्या आपण पाहत आहोत. जसजसे शिक्षण वाढत जाईल तसतसा अहंपणा कमी व्हायला पाहिजे, शिक्षणातून दशदिशा उजळल्या पाहिजेत, लाथ मारील तेथे पाणी काढील असा दुर्दम्य आत्मविश्वास प्रगाढ झाला पाहिजे, पण नेमके याच्या उलटे घडते, केवळ पदवीच्या भेंडोळीच्या आधारे नोकरीच्या प्रतीक्षेत राहून ती न मिळाल्याने त्याची चीड/संताप व्यक्त करणारी असंतोषाने खदखदणारी करोडोच्या संख्येने असणारी युवा पिढी तयार करण्यासाठी आपण केलेला तीनशे ते चारशे कोटींचा खर्च महागात पडणाराच आहे. एकवेळ पैसा भरूनही निघेल पण या तरुणांनी शिक्षणात घालवलेले ऐन उमेदीची व आयुष्याच्या सुरवातीची वर्ष कोण भरून देणार? बर यांचा अभ्यासक्रम काही यांनी ठरवला नाही, नर्सरी पासून पदवी पर्यंतच्या शिक्षण घेण्याच्या तुमच्या शैक्षणिक-अशैक्षणिक अटी-शर्तीही त्यांनी पाळलेल्या आहेत, त्यामुळे आता पदवीपर्यंत शिकलेल्यांच्या पुढच्या व्यवस्थेची जबाबदारी ही शिक्षण देणारांना कशी टाळता येईल?  यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत राजकारण न आणता आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे असे वाटते.


शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८


झाल्या तिन्ही सांजा करुन शिणगार साजा
वाट पाहते मी ग येणार साजन माझा..

या गीताचा मला भावलेला अर्थ मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. 

दादा कोंडके यांनी लिहिलेलं हे गीत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी ओठावर आहे.
प्रसिद्द लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी या गीतास लावणीचे रूप देऊन अधिकच प्रसिद्द केले. 
दादांच्या 'तुमच आमचं जमलं’ या चित्रपटातील हे गीत आहे. चित्रपटाची नायिका दिवसभर कामानिमित्त बाहेर आपल्या पतीची सायंकाळी आतुरतेने वाट पाहत असताना, तिच्या मनात आलेल्या भावना या गीतातून ती व्यक्त करत आहे. प्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण यांनी  या गीतास संगीतबद्ध केले आहे. या गीताचा च्या सुरुवातीला बैलगाडीला जुंपलेल्या  बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाज आणि पिपाणी  याचा उत्कृष्ट मिलाफ आहे.  तर गीताच्या मध्ये बासरी चा सुंदर साज चढवला आहे.  आत्यंतिक विरह झालेली विरहिणी या गीतातून आपल्या भावना व्यक्त करत आहे.
खरंतर दादा कोंडके हे त्यांच्या द्वर्थी संवादासाठी सुप्रसिद्ध आहेत.  त्यांच्या संवादातून गीतातून अनेक अर्थ निघतात.  बहुदा त्यांचे संवाद, गीत ही द्वर्थी चावट शृंगारिक अर्थासाठी प्रसिद्ध आहेत.
तसं पाहिलं तर हे गीत अतिशय सरळ, निरागस अशा प्रकारच आहे. या गीतातून त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार चावट अर्थ काढणे अवघड आहे. अगदी सरळसरळ  आपल्या प्रियकराला भेटायला आतुर झालेली त्याची प्रियकरणीच्या तोंडी येतील तेच शब्द या गीतामध्ये आहेत. 
आतापर्यंत दादांच्या वाक्या-वाक्यातून शब्दा-शब्दातून दुहेरी  चावट अर्थ काढून श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी त्याची मजा लुटली आहे.
मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये दादांनी त्यांना सेन्सॉर बोर्डात आलेल्या अडचणी सांगताना त्यांनी किती सहजपणे, सरळपणे  संवाद लिहिले आहेत, परंतु ऐकणाऱ्या वाचणाऱ्याच्या मनातच  भलत-सलत काही  असेल तर त्याला माझा नाईलाज आहे असे ते सेन्सॉर बोर्डाला ठणकावून सांगायचे.  दादा हे त्यांच्या चावट विनोद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत, पण खरं सांगायचं तर हा चावटपणा आणि विनोद सर्वप्रथम ऐकणाऱ्याच्या मनामध्ये मेंदूमध्ये असायला हवा तरच त्याला तो अर्थ सुचतो आणि समजतो. दादांची शब्दफेक आणि देहबोली यातूनच सारं काही कळून येतं. दादांचे चित्रपट पाहताना हसून हसून मुरकुंडी वळते, पण ज्याची भाषिक प्रगती झालेली नाही त्याला त्यातला विनोद कळत नाही, आणि दादांचा चित्रपट पाहताना असा so called white collared चुकून शेजारी येऊन मख्खासारखा बसला तर तोही एक विनोदाचाच विषय व्हायचा.
बऱ्याचदा शब्दांचे, दृष्यांचे अर्थ आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्या चष्म्यातून पाहून काढीत असतो. दादांच्या या ‘झाल्या तिनी सांजा’ या गीताचा मी काढलेला वेगळा अर्थ या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दादा आणि अध्यात्म  यांचा काही संबंध आहे का? अनेक संतानी केलेल्या रचना मधून एक सरळ अर्थ आणि एक गर्भित भावार्थ निघतो, अशा अनेक रचना आपण पाहिलेल्या आहेत. साध्या-साध्या शब्दातून ही संत मंडळी आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. अर्थातच आपलं आणि त्यांचं ट्युनिंग  किती जमतं  यावर ते अवलंबून आहे.
दादांच्या या गीतात मला एक उच्च प्रकारच अध्यात्म जाणवत.  अध्यात्म  सांगणं व समजून घेण  हे आजवर गंभीरपणे पाहिले गेलेले आहे, परंतु दादांचा स्वभाव हलकाफुलका, खोडकर, निरागस, खट्याळ अशा प्रकारचा असल्यामुळे त्यांच्या गीतातल अध्यात्म ही त्याच आयामातून पाहिले पाहिजे असं वाटत.
संत अध्यात्म सांगताना रूपकांचा वापर करतात.  अशाच प्रकारे या ठिकाणीही या गीतात रूपकांचा  वापर केलेला आहे.
माणसाच्या आयुष्याचे महत्त्वाचे तीन भाग केले तर आयुष्याच्या उत्तरार्धाला संध्याकाळ म्हटलेले आहे. या ठिकाणी दादांची नायिका “झाल्या तिनी सांजा, करुन शिणगार साजा, वाट पाहते मी गं, येणार साजन माझा” असं म्हणते. या ठिकाणी झाल्या तिनी सांजा या शब्दांचा अर्थ आता आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे, आयुष्याचा उत्तरार्ध झालेला आहे. आणि खुल्या मनाने आनंदाने ही नायिका तिच्या नायकाचा/प्रियकराचा म्हणजेच परमेश्वराची वाट पाहत आहे. या ठिकाणी ती आसुसलेली आहे, आणि मोठ्या आतुरतेने ती साजशृंगार करून वाट बघते आहे. या भूतलावरचा कार्य काळ आता संपला आहे, आता त्या भगवंताची-परमेश्वराची ओढ लागलेली आहे. आणि त्याची वाट ती पाहते आहे. सर्वसामान्य लोक अशी वेळ आली की रडायला लागतात, दुःखी होतात, कष्टी होतात आणि अत्यंत नकारात्मक होतात. दादांचा स्वभावच खट्याळ, हसतमुख, भोळाभाबडा, रडणं नाही कुढणं नाही, हसत-खेळत आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे, नुसतच हसत-खेळत नाही तर गाणं म्हणत त्याचे स्वागत करायला ती साज शृंगार करून सज्ज झाली आहे. हे अलौकिकच म्हणायला पाहिजे. ही नायिका म्हणते “प्रीतीच्या दरबारी येणार सरदार, मायेच्या मिठीत त्याच्या गळ्यात घालीन हार” “दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा वाट पाहते...” आयुष्याच्या तिनी सांजा झाल्या की लोक घाबरतात, पळ काढतात, लपतात  पण या ठिकाणी नायिकेने आत्यंतिक उच्च अध्यात्मिक दृष्टीकोनातून या गोष्टीकडे पाहून हे सर्व मनापासून स्वीकारलंय आणि म्हणून ती तिच्या भगवंताला- परमेश्वराला सरदार म्हणते. हा सरदार तिच्या प्रीतीच्या दरबारी येणार आहे. तो आल्यानंतर त्याच्यातला आणि तिच्यातल द्वैत संपून ती त्याच्यात समर्पित होऊन एकरूप झाली आहे. आणि म्हणून ती पुढे म्हणते या परमेश्वराच्या-भगवंताच्या “मायेच्या मिठीत त्यांच्या गळ्यात घालीन हार” या दिलाच्या देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा मी हृदयापासून बांधीन. 
पुढे ती म्हणते “भेटीत रायाच्या सांगेन मी सारं, सोसवेना बाई मला यौवनाचा भार”. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाला जगण्यासाठी खूप काहीकाही  कराव लागत.  हे करीत असताना त्याला भलं काय? बुर काय? नैतिक-अनैतिक या सगळ्यातून जाव लागत. असं व्यावहारिक जगात जगत असताना, प्रचंड दडपणातून तो जगत असतो, एक अनामिक भार तो आयुष्यभर वाहत असतो. यालाच ती नायिका म्हणते “सोसवेना बाई मला यौवनाचा भार” आयुष्यभराची भागदौड करून, धावपळ करून आता ती शिणलीय, थकलीय, तहानलीय, आता  पाणी पिण्याचही त्राणही  राहील नाही. म्हणून ती विनवतीय “तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा .. वाट पहाते मी गं  येणार साजन माझा” 
“त्याच्याच ओठांचा ओठी रंग लाल, आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल,  धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा”
आता तो (परमेश्वर ) आणि मी यात अंतर कुठाय तो काही वेगळा थोडाच आहे, त्याचे आणि तिचे ओठही एकाच रंगाचे,  धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा … असं धुंद होऊन जाव कोणतही द्वैत न राहता एकमेकात असं रंगून जाव विरघळून जावं.
“वाटत सख्याच वाजलं पाउल, खट्याळ मनाला वाटे खोटीच चाहूल…” अशा स्थितीत वाटेत एखाद पाउल वाजलं तरी तो आल्याचीच चाहूल लागते, हुरहूर लागते, तोच येतोय असं समजून साद घालावी, पण खोटीच चाहूल असेल तर उगाचच गाजावाजा, त्यामुळे साद घालायची तिची इच्छाही तशीच राहते आणि ती म्हणते “घालू कशी मी साद होईल गाजावाजा .. वाट पाहते मी गं येणार साजन माझा” 
आत्ता किती वेळ पाहायचा किती मनाची समजूत घालायची, का वेळ झाला असेल? ती विचारात पडलीये, आता तो आला की त्याला असं बिलगून बसायचं की जसं शंकर-पार्वती (शंभू-सारजा) ती म्हणते “विचार तो पडला विचार मनाला, वेळ का गं व्हावा बाई सख्या सजनाला, बिलगून बसावी शंभूला सारजा .. वाट पाहते मी ग ….”
राजेंद्र धारणकर

रविवार, ७ मे, २०१७


माझी फजिती-भाग ५
प्रेरणा आणि सायकल शिकणे ...   
-राजेंद्र धारणकर

माणूस आयुष्यात कोणाकडून काय प्रेरणा घेईल काही सांगता येत नाही. मलाही काही प्रेरणा मिळाल्याने माझ्याही आयुष्यात काही बदल घडला. त्याची आवर्जून सांगावी अशी ही  गोष्ट..

 साधारणपणे ५वी ६वीच्या वयाच्या टप्प्यावर मुलं सायकल (दुचाकी) चालवायला शिकतात. आमच्या मॉडर्न हायस्कूलच्या ग्राऊंडववर मे महिन्याच्या सुट्टीत सायकल चालवायला शिकण्याच्या कार्यक्रम असयचा.  माझ्या वर्गातले धनु संत, धनु भाटे हे मित्र सायकल चालवायला शिकवायचे, त्यांच्या सायकली त्याकाळातल्या अॅटलस, फिलिप्स,ए-वन अशा कंपनीच्या २४ इंची जडच्या-जड आणि मजबूत असायच्या. धनु संत त्यांची सायकल घेऊन यायचा. आमच्या बहुतेकांकडे त्यावेळी सायकल नव्हती.
माझी उंची त्या सायकलपेक्षा खूप कमी होती, माझी शरीरयष्टीही बारीकच होती. ज्याला सायकल शिकवायची त्याला सायकलच्या मधून दोन्ही पायडलवर पाय ठेवायला लावून मागून सायकल धरायची, शिकणाराने पायडलवर पाय मारायचे.  सुरवातीला कोणतेही जजमेंट नसल्याने पाय घसरणे, बॅलन्स सांभाळता न आल्याने पडायचे, सायकल बोकांडी पडायची. गुडघे फुटायचे, तोंड फुटायचं, हातापायाला लागायचं रक्त यायचं पण पुन्हा काही मिनिटात पोर पुन्हा सायकल शिकायला सुरवात करायचे, ‘गुडघे फुटल्याशिवाय सायकल चालवायला येत नाही असा वाक्प्रचारच त्यावेळेस होता. मी लहानपणी खूप घाबरट, भेकड होतो त्यामुळे हा सगळा पडा-पडीचा प्रकार पाहून मी जाम घाबरलो आणि घरी पळून आलो. सायकल चालवताना पडायच्या भीतीने मनात चांगलच घर केल होत आणि  त्याभीतीने सायकल चालवायला शिकायच राहूनच गेल. ही घटना १९७१-७२ मधली.

कालांतराने मी ११वीत असताना म्हणजे १९७६  सालची गोष्ट. आम्ही अकोल्यात कोल्हार-घोटी रस्त्यावर सारडा पेट्रोल पंपाच्या बाजूला राहायचो, त्या काळात रस्त्यावर रहदारी-वर्दळ अशी काही नसायची, अगदी पंपावरही मुल खेळ खेळायचे. समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे सोसायटीची (विविध कार्य. सेवा सोसायटी) मोठी मोकळी जागा होती. तेथे आमच्या समोरच्या आतल्या बाजूला राहणारी आमच्याच शाळेत असणारी आशा नावाची १०वीतली मुलगी, सायकल शिकायची, दोन-चार दिवसात सायकल शिकून मोठ्या ऐटीत ती आमच्या समोरच्या सोसायटीच्या जागेत, पंपावर भन्नाट सायकल चालवायची. तिला सायकल चालवताना पाहून माझा इकडे जाळ-जाळ व्हायचा. आमचं गाव त्यावेळी तसं खूप लहान, गावात मुलीने सायकल चालवण असं नव्हतच. गावात एखाद्याने नवीन सायकल आणली तरी त्याची गावभर चर्चा व्हायची असा तो काळ. आता ही पोरगी टेचीत माझ्या समोर सायकल चालवायची, आणि मी पुरुषासारखा पुरुष असूनही (हाही पुरुषी अहंकार) मला सायकल चालवता येत नाही, याची मला खूप चीड यायला लागली. माझा मलाच राग यायला लागला. आपणही सायकल शिकली पाहिजे हे पक्क डोक्यात घेतल. पण आता या वयात (शरीर वाढलेले, ऊंची-वजन वाढलेले) कोण सायकल शिकवणार?  आणि आता जर सायकल चालवताना पडलो तर? मनामध्ये विचारांचा हा कल्लोळ. पण ऐटीत सायकल चालवणारी ती पोरगी माझ्या मनातल्या मनात मला खूप हिणवायची, खिजवयाची खूप चिडचिड व्हायची. मग काहीही झालं तरी  सायकल चालवायला शिकायचेच  हा मनाशी हिय्या केला.

एकदा मनाचा हिय्या केला आणि अगदी ८-१० वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या लहान चाकाची सायकल खांबेकरच्या सायकल दुकानातून भाड्यानी आणली. आमच्या घरापासून संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास एक फर्लांगाचा उतार होता. त्या रस्तावर त्या छोट्या सायकलच्या सीटवर बसून सायकल उताराच्या बाजूला सोडून दिली, उभा राहिलो तरी दोन पायांमधून सायकल आरामात खालून निघून जाईल इतक्या  कमी उंचीची सायकल, अशा सायकलवर अस्मादिक बसले. एवढी छोटी सायकल, पण त्या सायकलच्या पायडलवर पाय न ठेवता दोन्ही पायांनी मी सायकल वल्हवत होतो. एवढ विचित्र आणि हास्यास्पद दिसत असेल  ते ज्याचं नाव ते, लोक माझ्याकडे पाहून हसायचे. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून, होणारी अवहेलना गिळून सायकल शिकायचा उपक्रम मी चालू ठेवला. उतार संपला की सायकलवरून उतरायचं आणि सायकल ढकलीत वर यायचं आणि पुन्हा उताराच्या दिशेनी... एकदा असचं चालू असताना एक धोतर घातलेला माणूस समोरून येत होता, मला उतारावर ती सायकल काही कंट्रोल झाली नाही, आणि त्या माणसाच्या दोन्ही पायाच्या बरोब्बर मध्ये सायकलच चाक गेलं, व्हायचं तेच झालं, त्याला नको तिथे मार बसला, एव्हढा चिडला तो माणूस, त्याने मला धरून चांगला बद्कावला, धोपटला. आधीच लहान पोरांची सायकल, एवढा  मोठ्ठा घोडा झालेला मी, ती सायकलही मला चालवता येऊ नये, भररस्त्यात, गर्दीत खूप खूप फजिती झाली, मार खाल्ला.

पण त्यानंतर मी आमच्याकडे असलेली २४ इंची सायकलच्या मागच्या कॅरीअर वर बसून पुन्हा तोच प्रयोग सुरु केला. हळू हळू बॅलन्सिंग जमायला लागलं. पाय वर घेऊन पेडल मारता यायला लागले, मग अनेक दिवस मी कॅरीअर वर बसूनच सायकल चालवायचो, नंतर कॅरीअरवरून सीटवर बसायचा प्रयत्न करायला लागलो, हळूहळू तेही जमायला लागले. काही दिवसातच सीटवरून सायकल चांगली चालवायला शिकलो. सायकलिंगची मजा घायला लागलो. तासंतास सायकल चालवायची जवळपासच्या गावांची भटकंती करायची. इतर मित्रांबरोबर कधी-कधी आसपासची गाव, ठिकाण, संगमनेरलाही सायकलवर जाण  होऊ लागल. अकोल्यापासून ५० मैल लांब असलेल्या शिर्डीलाही अनेक रविवारी सायकलवरून प्रदक्षिणा झाल्या.

सायकल येत असल्यामुळे पुढे राजदूत, जावा-येझदी या मोटरसायकलही चालवता यायला लागल्या.

आयुष्यात अनेक गोष्टी, अशा गोष्टी (ज्याला आजकाल लाईफ स्किल्स म्हणतात) वेळच्या वेळी झाल्या नाही तर पुन्हा होत नाहीत, अनेकांना पोहोता येत नाही, डोंगर-दर्‍यात फिरायला भीती वाटते, अशा अनेक गोष्टी त्यातली भीती काढून टाकून त्या केल्याच पाहिजेत, ५८ वय असलेला माझा मित्र अनिल आजही दुचाकी चालवीत नाही. आणि मग राहून राहून मनामध्ये हाच विचार येतो की जर ती आशा नावाची मुलगी आमच्या समोर टेचीत सायकल चालवत नसती, तर सायकल चालवण्याची जिद्द, खुन्नस ही माझ्या मनात कधीच निर्माण झाली नसती, तिच्याकडून प्रेरणा घेऊनच मी दुचाकी चालवायला शिकलो हे मला आज जाहीररीत्या सांगायला काहीही संकोच  वाटत नाही.
माझ्या पुरतीच आणि फक्त मलाच माहित असलेली ही गोष्ट मी आज प्रकट करीत आहे.  अप्रत्यक्षपणे मला सायकल चालवण्याची प्रेरणा देणार्‍या आशाला मन:पूर्वक धन्यवाद.